पुणे : शहरातील गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी बुधवारी रात्री शहर पोलिस दलाने संपूर्ण शहरात कोंम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यात ५७ गुन्हे दाखल केले असून, ७३ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळ्या, रायझिंग गँग, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती, समाजविघातक कृत्य करणाऱ्या संघटना, व्यक्ती, हिस्ट्रिशिटर, हॉटेल/लॉजेस/ढाबे, एसटी व बसस्थानके, रेल्वेस्थानके तपासण्यात आली. यात एकूण १५४४ गुन्हेगारांना तपासण्यात आले. त्यापैकी ७१६ गुन्हेगार मिळून आले.
पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्या आदेशान्वये अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंग गिल, स्मार्तना पाटील, संभाजी कदम, शशिकांत बोरोटे, आर राजा, विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली.
याचा लागला छडा
- धायरी येथील प्रणव विनोद कुंभार (वय १९) यांच्याकडून १ गावठी पिस्टल व १ जिवंत काडतूस जप्त केले.
- शस्त्र बाळगल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल करून ३ आरोपींना अटक केली.
- दारुबंदीच्या ३७ केसेस करून ३७ आरोपींकडून ८१ हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली.
- बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्यांविरोधात १० केसेस करून २६ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ३३ हजार रुपयांचा जुगाराचा माल जप्त केला.
- नाकाबंदीदरम्यान शहरातील पोलिस ठाण्यांकडून १२२७ संशयित वाहनचालकांची तपासणी करून त्यांच्यापैकी ३०४ जणांवर २ लाख ३२ हजार ६०० रुपये दंडात्मक कारवाई केली.
- वाहतूक शाखेकडून ९९९ संशयित वाहन चालकांची तपासणी करून २९३ जणांवर कारवाई केली, यात २ लाख १२ हजार १०० रुपये दंड वसूल केला.