पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीच्या आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणी विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेत पुणे पोलिसांच्या तपासावर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करत जात आहे. टीकेनंतर देखील पुणे पोलिसांना पूजा प्रकरणी कितपत गांभीर्य आहे असा मुद्दा उपस्थित व्हावा असा काहीसा प्रकार पुण्यात घडला. पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण प्रकरणावर प्रश्न विचारताच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हसले आणि उत्तर न देताच निघूनही गेले. या घडल्या प्रकाराची चर्चा झाली नसती तरच नवल..
पुण्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी गुप्ता यांना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे नेते व नुकताच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, पूजाच्या शव विच्छेदन अहवालात नेमके काय आले याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी गुप्ता यांनी पत्रकारांना कोणतेही उत्तर न देता पत्रकार परिषदेतून निघून गेले.
पूजाच्या शवविच्छेदन अहवालात काय आहे.... वानवडी पुणे पोलिसांना पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल काल प्राप्त झाला आहे. प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. या अहवालात तिच्या मणक्याला आणि डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल असे या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राठोड यांना द्यावा लागला राजीनामा.. तत्पूर्वी, पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला. राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगतानाच या प्रकरणात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
पूजाच्या आई- वडिलांना राठोडांनी ५ कोटी रुपये दिले..पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार नाही, तोवर लढा सुरू ठेवला जाणार आहे. सर्वसामान्य व्यक्तीवर लगेच गुन्हा दाखल केला जातो; मात्र, मंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दिली आहे. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले, असा दावा त्यांनी केला.