पुणे : शहर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण अधिक आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवत असल्याने गंभीर अपघात घडत आहेत. अशा बेशिस्त चालकांचे वाहनच सहा महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार आहे. याबाबत कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी माेहीम राबवण्यात येते. कारवाई करूनही वाहनचालक सर्रास वाहतूक नियमभंग करत असल्याचे दिसून आले. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, मोबाइलवर संभाषण, ट्रिपल सीट, मद्य पिऊन वाहन चालवणे, कार चालवताना सीट बेल्ट न लावणे अशा प्रकारचे नियमभंग सर्रास केले जातात. विरुद्ध दिशेने वाहन चालवताना आढळून आल्यास संबंधित वाहन सहा महिन्यांसाठी जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
वाहतूक पोलिसांकडून गेल्या पंधरा दिवसात २५ हजारांहून जास्त बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. शहरात गंभीर स्वरूपांच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक पोलिस दिवसभरात दोन सत्रात काम करतात. वाहतूक शाखेतील ८५० पोलिस कर्मचारी दोन सत्रात विविध चौकात वाहतूक नियमन करतात. वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर अपघात घडतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. शहरात दररोज दोन ते तीन गंभीर अपघात घडतात, असेही पाेलिस आयुक्तांनी नमूद केले.
अवजड वाहनांना बंदी...
शहर, तसेच उपनगरात बांधकामे सुरू आहेत. सिमेंट वाहतूक करणारे डंपर, काँक्रीट मिक्सर अशा अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात घडत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
पंधरा दिवसांत (१ ते १६ ऑक्टोबरपर्यंत) केलेली कारवाई
विरुद्ध दिशेने जाणारे वाहनचालक - २१ हजार २८५ट्रिपल सीट - २ हजार ८७२मद्य पिऊन वाहन चालवणे - ५७०जप्त केलेली वाहने - २१५