पुणे : मेफेड्रॉन (एमडी) ची डिलिव्हरी देण्यासाठी निघालेला सराईत गुन्हेगार वैभव माने हा सोमवार पेठेत अलगद पाेलिसांच्या जाळ्यात अडकला. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने १९ फेब्रुवारी रोजी त्याला अटक केली. अधिक तपासात विश्रांतवाडी येथील हैदर नूर शेख याची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी मिठाच्या गोदामातून तो एमडीची तस्करी करत असल्याचे पुढे आले. हैदरच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर एवढ्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झाला.
गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे आणि सतीश गोवेकर यांना हैदर शेख याच्या मोबाईलमध्ये विविध गाड्यांचे नंबर, इलेक्ट्रिक मीटर, ड्रग्ज ओढण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, काही ठिकाणे असे १६ फोटो मिळून आले. त्याच वेळी पोलिसांना या ड्रग्ज रॅकेटचा आवाका मोठा असल्याची कल्पना आली. तेथूनच पोलिसांनी ‘ऑपरेशन अर्थकेम’ ही विशेष माेहीम हाती घेतली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या परवानगीने पोलिसांची १६ पथके तयार करून तेवढेच मनुष्यबळ रिझर्व्ह ठेवण्यात आले. याच मोहिमेद्वारे पोलिसांनी विश्रांतवाडी, दिल्ली, मुंबई, सांगली, बिहार, पंजाब, सोलापूर, नगर या ठिकाणी छापे टाकले. या ऑपरेशनमध्ये त्या सोळा फोटोंनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून येते.
हैदरच्या मिठाच्या गोडाऊनमधून पोलिसांना ५५ किलो एमडी मिळाले. ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे कुरकुंभ एमआयडीसीत असल्याचे समोर आल्यानंतर, चौकशीत टेम्पो चालक आणि हमालांनी पोलिसांना माल कोठून कोठे आणि कसा गेला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुंबई, दिल्ली गाठली. याचवेळी पोलिसांना सांगलीच्या मकानदार याची माहिती मिळाली. तेथून पोलिसांनी मोठा एमडीचा साठा जप्त केला.
संदीप धुनिया याने ड्रग्ज निर्मिती, वाहतूक आणि विक्री; तर हैदर शेख याने ड्रग्ज प्रकरणात वितरणाची महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासात पुढे आले. याचवेळी पोलिसांना दिल्लीतील एमडी साठवून ठेवलेल्या ठिकाणांची माहिती मिळाली. तेथून पोलिसांनी दिल्ली, पंजाब, बिहार, सोलापूर, नगर येथे पथके तैनात केली. स्वतः अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्यासह सहायक आयुक्त सुनील तांबे आणि सतीश गोवेकर यांनी ऑपरेशनची कमान सांभाळली. तीन दिवस अखंड मेहनत करून त्यांनी हे ऑपरेशन यशस्वी करून दाखवले.
...तर पोलिसांच्या हाती काहीच लागले नसते :
गुन्हे शाखेने आपला मोर्चा कुरकुंभ एमआयडीसीकडे वळवला. पोलिसांच्या पथकाला पोहोचण्यास १५ मिनिटे उशीर झाला असता तर अर्थकेम कंपनीतील एमडी सापडले नसते. आरोपींनी डिलिव्हरीसाठी कंपनीतील एमडी कंपनीच्या गेटजवळ आणून ठेवले होते, ते जर वाहनात भरून निघाले असते तर पोलिसांच्या हाती काहीच लागले नसते, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासोबतच दिल्लीला गेलेल्या पोलिसांच्या पथकासोबतही असेच झाले. आरोपींनी एमडी दुसऱ्या राज्यात व देशात पाठवण्यासाठी वाहनाद्वारे नेण्यात येत असताना, पोलिसांनी त्यांना पकडले. दिल्लीत पोलिसांना दोन तासांचा उशीर झाला असता तरी हे ड्रग्जचे रॅकेट पोलिसांच्या हाती लागू शकले नसते, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम आम्ही करत आहोत. संदीप धुनिया हाच या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईतून दिसून आले आहे. आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी आम्ही हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त