लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना प्रार्दुभावाच्या ९ महिन्यांच्या काळात ‘कोरोना वॉरियर’ हा पोलीस दलाचा नवा चेहरा समाजासमोर आला. कोरोनाचे रुग्ण जगभर वाढत असताना पुणे पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच या संबंधी चर्चा केली होती. तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. वेंकटेशम वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी कोरोनाच्या वादळासाठी तयार राहून कशी काळजी घ्यावी लागेल याचा विचार पुणे पोलिसांनी केला.
पुण्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर भविष्यात निर्बंध घालावे लागतील, हे ओळखून निर्बंधांना कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी आराखडा तयार केला. शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी पुणे पोलिसांचा निर्बंधाचा आराखडा तयार होता. पुण्याचे सह आयुक्त रवींद्र शिसवे हेदेखील डॉक्टर आहेत. शिसवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेला हा आराखडा राज्यातील अनेक पोलीस आयुक्तालय, जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून वापरण्यात आला.
रस्त्यावर बिनकामाचे कोणी दिसणार नाही यासाठी पोलिस दिवस-रात्र लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर उभे होते. लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या हजारो लोकांना घरातच थांबवून ठेवण्याचे अवघड काम पोलिसांनी केले. दानशुर व्यक्तींच्या मदतीमुळे पुणे पोलिसांनी या स्थलांतरीतांना तसेच ‘नाही रे’ वर्गातील लोकांसाठी धान्य, फुड पॅकेट्स वाटपासाठी वेगळी यंत्रणा उभी केली. जवळपास १६ लाख फुड पॅकेटस पोलिसांनी वितरीत केली.
रुग्ण आढळल्यानंतर त्याच्याशी संपर्क आलेल्यांचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करण्यासाठी स्वतंत्र पथक करण्यात आले. या काळात पोलिसांनी सुमारे २ लाख लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले. त्यातून काही हजार संभाव्य रुग्ण आढळून आले. स्थलांतरितांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी त्यांची नोंद करुन, रेल्वे, एस टी बस उपलब्ध करुन त्यांना सर्व नियमांचे पालन करुन गाडी बसवून गावी पाठविण्याची मोठी कामगिरीही पोलिसांनीच पार पाडली. सुमारे १ लाख लोकांना १०० रेल्वेगाड्यातून त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले. २४ मार्च ते ३१ ऑगस्ट दरम्यान पोलिसांनी ४ लाख २ हजार २४३ जणांना ई पास दिले. त्याचबरोबर वैद्यकीय कारणासाठी प्रवास करण्यासाठी ६८ हजार ३८ जणांना ई पास देण्यात आले.
चौकट
कोरोना योद्धे झाले बाधित
लोकांनी घरात रहावे म्हणून २४ तास रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांना कोरोनाने गाठल्याच्या घटना घडल्या. यात ९ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले. तर, आजवर १ हजार ६०० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला. आजवर कधीही केली नाहीत अशी असंख्य कामे पोलिसांनी या काळात केली. समाजाकडून दुर्लक्षित असलेल्या हे शिस्तबद्ध दल या कामामुळे समाजाच्या पसंतीस उतरले. पोलिसांकडे पहाण्याची समाजाची नजर बदलण्यास कोरोनाची एकप्रकारे इष्टापतीच ठरली.