पुणे : कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीला राजकीय वळण मिळाले असून त्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले आहेच. मात्र इतकेच नव्हे तर पोलीस दलातही त्यांच्या बदलीला विरोध होत असल्याचे बघायला मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या व्हॉट्स ऍप स्टेटसमध्ये गायकवाड यांचा फोटो ठेवला आहे. भाजप आमदारावर गुन्हा दाखल केल्यामुळे गायकवाड यांची बदली केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र राजकीय पक्षांनी या प्रकरणात उडी घेतल्याने ही बदली चर्चेची बनली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या साथीदारांवर ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा राग धरून सरकारने त्यांची बदली केल्याचा आरोप मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे गायकवाड यांची बदली विनंतीनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे या विषयाचे राजकारण करू नये असे आवाहन पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी केले आहे. मात्र त्यालाही दाद न देता हे प्रकरण वाढताना दिसत आहे. त्यातच पोलीस दलातील कर्मचारीही नाराजी व्यक्त करत आहेत. अर्थात थेट प्रतिक्रिया व्यक्त करणे शक्य नसताना त्यांच्या या स्टेटसचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.