पुणे : प्रेमसंबंधात ब्रेकअप केल्याच्या कारणावरून तरुणीवर भर दिवसा एका माथेफिरूने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण शहर पोलिस दल खडबडून जागे झाले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढविण्यात आली असून, बीट मार्शलची संख्या वाढवली जाणार असल्याचे पोलिसआयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले होते. तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या वृत्तानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तरुणांनी या तरुणीचा जीव वाचवून तिला पेरुगेट पोलिस चौकीत आणल्यानंतर तेथे कोणीही पोलिस नव्हते. तेथे ड्युटीवर असलेले दोन्ही पोलिस कर्मचारी नव्हते. घटनास्थळी पोलिसांना पोहोचण्यास उशीर झाल्याने पोलिसांवर टीका होऊ लागली. अशातच आयुक्तांनी माध्यमांशी संवाद साधताना पुणे शहरातील १११ चौकी आता २ शिफ्ट मध्ये २४ तास सुरू राहतील असे सांगितले आहे.
सदाशिव पेठेत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. शंतनू लक्ष्मण जाधव (२१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे त्या माथेफिरूचे नाव आहे. सकाळी दहाच्या सुमारास पेरुगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली. त्यानुसार जाधववर खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीवर हल्ला करत असतानाच जाधव याला लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी पकडले. त्यामुळे या हल्ल्यातून तरुणी बचावली. त्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी चोप देऊन जाधव याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या घटनेत तिला घेऊन नागरिक पेरुगेट पोलीस चौकीत गेले. त्यावेळी पोलीस चौकीत नेमणूकील असलेले पोलीस कर्मचारी चौकीत नव्हते. पोलिस ठाण्यासमोर शेकडो लोकांचा जमाव होता. त्यांचा पारा चढला होता, अनेकांनी तर पोलिस ठाणेच जाळून टाका, अशी आरोळी दिली. माथेफिरूचा जीव आणि लोकांचा रोष याच्या मध्ये उभा राहिला होता. या घटनेची आयुक्तांनी दखल घेतली व त्यानंतर चौकीतील तीन पोलिसांना निलंबित केले. आता मात्र शहरातील गुन्हेगारी वाढत चालली असल्याने आयुक्तांनी सुरक्षा कडक करण्याचे आदेश दिले आहेत.
आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले काही महत्वाचे मुद्दे
- पुण्यात ३ दिवसांपूर्वी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे पण याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे
- जे मुलगा आणि मुलगी आहे त्यांचे देखील समुपदेशन सुरू आहे
- ६ महिन्यात ३१ जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे
- पुण्यातील पोलिस चौकी २४ तास कार्यान्वित करणे तसेच सी सी टिव्ही आणि त्याला मॉनिटर करणे आता सुरू होणार
- पुण्यातील १११ चौकी आता २ शिफ्ट मध्ये २४ तास सुरू राहतील
- कोविड काळात किंवा त्याआधी पुण्यातील ज्या चौक्या बंद होत्या त्या आता सुरू होणार
- पुण्यातील सर्व शाळा, ट्युशन, कॉलेज मध्ये महिला सुरक्षा साठी आता तक्रार "ड्रॉप बॉक्स" सुरू करणार
- जी तक्रार देणारी तरुणी किंवा महिला असेल तिची ओळख गुप्त ठेवण्यात येईल आणि तक्रार येताच त्याची दखल घेतली जाईल
- शाळा, कॉलेज, महाविद्यालये तसेच शहराच्या वस्ती भागात व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन करणार