पुणे : रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने लावलेल्या वाहनावर कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालून त्यास गंभीर जखमी करणा-या आणि दोन दुचाकीचालकांना ठोकरणा-या मोटारचालकास अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी ३ वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.कमल जुगराज जैन (वय ७१, रा. न्याती हायलँड, मोहम्मदवाडी, हडपसर) या ज्येष्ठाला शिक्षा झाली आहे. याप्रकरणी वाल्मीक बाबूराव जाधव (वय ५०, रा. हडपसर) या तत्कालीन सहायक पोलीस फौजदारांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना १७ जुलै २००९ मध्ये सकाळी अकराच्या सुमारास एमजी रस्त्यावरील अरोरा टॉवरजवळ घडली होती. जैन यांनी हॉटेल अरोरा टॉवरसमोर मोटार चुकीच्या पद्धतीने लावली होती. या गाडीवर कारवाई करीत असताना जैन येथे आले. त्यांनी गाडी सुरू करीत जाधव यांच्या अंगावर घातली. त्यांनी गाडीच्या बॉनेटवर उडी घेतली. त्यानंतरही जैन यांनी गाडी न थांबविता तशीच पुढे दामटली. त्यानंतर त्यांनी दोन दुचाकीचालकांना धडक देऊन त्यांना जखमी केले. यात सतीश साहेबराव कान्होळकर आणि पत्नी नीलिमा या गंभीर जखमी झाल्या होत्या.विशेष शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी जैन यांना गाडी थांबविण्याचा इशारा केला होता. मात्र, त्यानंतरही गाडीच्या बॉनेटवर धोकादायकरीत्या लटकलेल्या जाधव यांना घेऊन जैन यांनी गाडी तीन तोफा चौकाच्या दिशेने दामटली. अखेर पोलिसांनी बंदुकीतून सहा गोळ््या गाडीच्या चाकावर झाडल्या. त्यानंतर त्यांनी जोराने ब्रेक दाबला. त्यामुळे जाधव रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले होते.याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यात पोलीस उपायुक्त सेनगावकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तपासी अधिकारी म्हणून सुहास नाडगौडा यांनी काम पाहिले. त्यांना ए. बी. हुंडेकरी यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहाय्य केले.
पुणे: पोलिसाच्या अंगावर गाडी; खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी वृद्धास तीन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 6:32 AM