किरण शिंदे
पुणे : पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने डिझेलचोरांना पकडण्यासाठी स्वतःसह दोघांचा जीव धोक्यात घातल्याचा प्रकार उघडकीस आला. सिंघम थाटात या पोलीस अधिकाऱ्याने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे तर हाती लागलेच नाहीत, परंतु या पोलीस अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणाची मात्र पुणे पोलीस दलात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. रतिकांत चंद्रशा कोळी असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्याचे असे झाले की, डिझेलची चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्र गस्तीवरील पोलीस अधिकारी असलेले कोळी पोलीस गाडी घेऊन घटनास्थळी गेले. चोरट्यांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी अंबर दिवाही बंद केला. मात्र अचानक पोलिसांची कार पाहिल्यानंतर चोरट्यांनी घाईत कार अतिशय वेगाने पाठिमागे रिव्हर्स घेतली. हे पाहून संबधित पोलीस अधिकारीही कारच्या पाठिमागे धावला. काही अंतरावर पाठिमागे कार घेण्यास रस्ता नसल्याने चोरट्यांनी मग कार त्याच स्पीडमध्ये थेट पोलीस अधिकाऱ्याच्या दिशेने घेतली. त्यावेळी पोलीस अधिकारी बाजूला झाला अन् चोरट्यांनी तेथून पळ काढला. यानंतर या अधिकाऱ्याने कारच्या दिशेने गोळी झाडत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. नवले ब्रिजजवळील वंडरसिटी येथे हा प्रकार मध्यरात्री घडला आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत उपनिरीक्षक रतिकांत चंद्रशा कोळी (वय ३०) यांनी तक्रार दाखल केली आहे.
त्या दिवशी रतीकांत कोळी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्र गस्तीवर होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना वंडरसिटी भागात एक कार व त्यात काही तरुण मोठ्या गाडीजवळ उभा असल्याचे दिसले. संशय आल्याने ते सोबत असलेल्या सहकाऱसह त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी जातात एका मोठ्या गाडीतून डिझेल चोरी होत असल्याचा त्यांच्या लक्षात आलं. परंतु, पोलिसांची गाडी दिसताच दोन चोरटे घाईत गाडीत बसले. त्यांच्या हातात धारधार हत्यारे दिसली. पोलीस गाडी थांबताच चोरट्यांनी त्यांची गाडी सुरू केली. उपनिरीक्षक रतिकांत यांनी त्या चोरट्यांना थांबण्याचा इशारा केला. पण, पोलीस आपल्या दिशेने येत असल्याचे दिसताच या चोरट्यांनी कार हायस्पीडमध्ये तशीच पाठिमागे घेतली. शंभर मिटर गाडी पाठिमागे घेऊनही पोलीस पाठलाग करत असल्याचे दिसले. तेव्हा चोरट्याने गाडी जागेवर थांबवत पुन्हा ती गाडी पोलिसांच्या दिशेने स्पीडमध्ये आणत अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपनिरीक्षक रतिकांत हे बाजूला झाल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर उपनिरीक्षक रतिकांत कोळी यांनी या चोरट्यांच्या कारच्या काचेवर गोळी झाडत कार थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, गोळी न लागल्याने चोरटे नवले ब्रिजच्या दिशेने पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.