पुणे - सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोधी करणाऱ्या सभेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता सारसबागेत या सभेचे आयोजन करण्यात येणार होते. या सभेला महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार जिग्नेश मेवानी, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह विविध मान्यवर संबोधित करणार होते. संविधान बचाव मंच आणि कुल जमाअत -ए - तंजीमने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. मात्र आता पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कार्यक्रम होणार की नाही यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.यापूर्वीही 15 डिसेंबर रोजी या कायद्याच्या विरोधातील सह्यांच्या मोहिमेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परवानगी नाकारली होती. याबाबत कोळसे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, 'मी कार्यक्रमाला जाणार आहे. नुसते बोलण्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात येत नाही. तिथे फक्त सभा होणार आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा तेढ निर्माण होण्याचा प्रश्नचं नाही'. मोहन जोशी म्हणाले की,'आमच्या कार्यक्रमाला परवानगी आहे आणि आज संध्याकाळी कार्यक्रम होणारच आहे'.
सीएए व एनआरसी विरोधी कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 2:27 PM