निखिल गायकवाड -
पुणे : "आपल्या घरी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांनी सुरू केलेली पायपीट थांबण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने मोफत बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या चालत जाण्याचा वेदना टाळण्यासाठी "एसटी"च्या वतीने दर्शविलेल्या "सामाजिक बांधिलकी"ला पुणेपोलिसांच्या वतीने "सॅल्यूट" करून मानवंदना देण्यात आली. खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स मैदानातून एसटीच्या 35 बसेस बुधवारी विविध राज्यांमध्ये रवाना करण्यात आल्या. सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य परिवहन मंडळाच्या या अनोख्या कार्याला पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने अनोख्या पद्धतीने "मानवंदना" देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या मुख्य रस्त्यावर अनेक परप्रांतीय मजूर पायी कुटुंबांसह चालताना दिसत आहेत. त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने अथवा प्रसंगी पायी चालत जाण्याचा वेदनादायी मार्ग त्यांनी निवडला होता. त्यांना त्यांच्या मूळ गावी सुरक्षित जाता यावे यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने काही दिवसांपासून खाजगी बसेस तसेच रेल्वेच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यात येत आहे. या माध्यमातून शहरातील हजारो परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ गावी सुरक्षित पोहोचले आहेत. वैद्यकीय तपासणी सह आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देत सोशल डिस्टसिंगचे पालन करत सुरक्षितपणे त्यांना पोहोचविण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. मंगळवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्याशी संपर्क साधून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठीच्या व्यवस्थेबाबत विचारणा केली होती. लॉक डाऊनमुळे मजुरांचे झालेले हाल, पैशांची कमतरता इतर अनेक अडचणी लक्षात घेता त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वाहन व्यवस्था आवश्यक होती. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या समस्येवर उपाययोजना करत राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेस मोफत उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे शहराच्या विविध भागातून बुधवारी 35 एसटी बसेसच्या माध्यमातून साडेसातशे हून अधिक परप्रांतीय मजूर आपल्या कुटुंबियांसह सुरक्षितपणे त्यांच्या मूळ गावी रवाना झाले. पुणे शहर पोलीस आयुक्त व सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांचे पोलीस उपायुक्त पोलीस स्टेशन निहाय मजुरांच्या नोंदी केल्या. वैद्यकीय तपासणी सह चहा, नाश्ता,जेवण तसेच आवश्यक साहित्य सह शहराच्या विविध ठिकाणांवरून त्यांना सुखरूप त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले. राज्य परिवहन मंडळाच्या वतीने "सामाजिक बांधिलकी" चे दर्शन घडवित या मजुरांसाठी मोफत बसेस उपलब्ध करून दिल्या. तसेच त्यांना त्यांच्या मूळ गावी सुरक्षितपणे सोडवण्यासाठी बसचे चालक व वाहक यांनी घेतलेल्या मोठ्या जबाबदारी बद्दल पुणे शहर पोलीस दलाच्यावतीने त्यांना "सॅल्यूट" करण्यात आला. सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, विमानतळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे निरीक्षक बळवंत मांडगे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. "माध्यमांनी रस्त्याने चालणार्या मजुरांच्या वेदना नक्कीच समाजासमोर मांडाव्यात. मात्र त्याच सोबत अशा मजुरांची पायपीट थांबवण्यासाठी त्यांना प्रशासनाच्या कडून योग्य ती मदत मिळवून देत पोलिसांच्या सहकार्याने सुरक्षितपणे त्यांच्या मूळ गावी पोचविण्यात येईल याची देखील माहिती उपलब्ध करून द्यावी. तसेच असे दुर्दैवी प्रकार घडत असतील तर त्या बाबत तात्काळ पोलीस प्रशासन असा शासकीय यंत्रणांना देखील माहिती देण्यात यावी" असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी यावेळी केले. फोटो ओळ - परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी सुरक्षितपणे जाण्यासाठी मोफत एसटी बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे पोलिसांच्या वतीने सॅल्यूट करत अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.