पुणे : अवघ्या साडेतीन वर्षांचा अविनाश... सर्वसाधारण मुलांप्रमाणे हसरा, खेळता अविनाश घराजवळ खेळत असताना गायब झाला आणि घरच्यांसह पोलिसांचाही धाबं दणाणलं. अखेर पोलिसांनी शोध घेतला आणि समोर आलं ते धक्कादायक वास्तव. पुणें जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर येथील यात्रेत भीक मागण्यासाठी त्याला पळवणाऱ्या दोघांना अटक केली आणि त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर हसू आणून ऑपरेशन 'मुस्कान' पूर्ण केलं.
लाला शिवाजी सूर्यवंशी (वय ३८) आणि सुनीता लक्ष्मण बिनवात (वय ३० ) यांना अटक करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, मजुरी करणाऱ्या गोविंद आडे यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा तीन दिवसांपूर्वी गायब झाला. आडे यांचे कोणाशीच भांडण अगर वैर नसल्याने पोलिसांना तपासात एकही दुवा सापडत नव्हता. त्यात त्याच्या पालकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने हे अपहरण खंडणीसाठी झाले नसल्याचा त्यांचा निष्कर्ष होता.कदाचित भीक मागण्याच्या उद्देशाने त्याला उचलून नेले असावे अशा अंदाजाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या तपासात त्यांनी एक, दोन नव्हे तर तब्बल ११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यात एका फुटेजमध्ये एक महिला आणि पुरुष लहान मुलासोबत जाताना दिसले. तोच धागा पकडून ते आरोपींचा माग काढला तो थेट वीर पर्यंत. मात्र तिथल्या यात्रेत असणाऱ्या गर्दीत त्यांना अविनाशचा गुप्तपणे आणि कसून शोध घेणे सुरु होता. अखेर रात्रभर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला बुधवारी सकाळी साडेआठ वाजता एक लहान मुलगा कापडात गुंडाळून ठेवलेला आढळला. आजूबाजूच्या झुडपात लपून बसलेले आरोपी त्यांनी शिताफीने झडप घालून पकडले आणि अखेर ऑपरेशन मुस्कान यशस्वी झाले.
यावेळी आरोपी भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याचे स्पष्ट झाले. भीक मागताना लहान मूल जवळ असल्यास अधिक पैसे मिळतात या उद्देशाने त्यांनी अपहरण केल्याचे कबूल केले. त्यांनी यापूर्वीही असे कृत्य केले आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. या तपासात पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, नितीन बोधे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे आणि पथकाने मिळून यांनी सहभाग नोंदवला.