पुणे : एटीएम मशीनमध्ये छेडछाड करुन लाखो रुपये काढून घेण्याच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कानपूर येथे अटक केली. विकास दुबे इन्काऊंटमध्ये सहभागी असलेले पोलीस निरीक्षक शैलेंद्रसिंह व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला पकडले. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली
मुकेश यादव (रा. कानपूर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेने यापूर्वी संदीपकुमार, अरविंदकुमार आणि अशोककुमार (तिघे रा. नऱ्हे) यांना अटक करण्यात आली आहे़ स्टेट बँकेच्या हिं गणे खुर्द येथील एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये छेडछाड करुन ९६ हजार रुपये काढले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली होती. संदीपकुमार याच्याकडे ५८ एटीएम कार्ड, अशोककुमार याच्याकडे ८ एटीएम कार्ड सापडली होती. त्याने ही कार्ड आपल्याला मुकेश यादव याने दिल्याचे सांगितले होते. त्यानुसार पुणे पोलिसांचे पथक कानपूरला आले. एटीएम कार्डचे कुरियर घेण्यासाठी तो येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक शैलेंद्रसिंह व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मुकेश यादव याला पकडले.
मुकेश यादव हा तेथील लोकांकडून एटीएम कार्ड घेत असे. त्यांना दरमहा ५ हजार रुपये किंवा त्यांच्या खात्यात जेवढे पैसे येतील, त्याप्रमाणात टक्केवारी देत असे. ही कार्डे घेऊन तो पुण्यात येत व ती कार्डे संदीपकुमार याच्याकडे देत. संदीपकुमार त्या खात्यात आपल्याकडील २० हजार रुपये टाकत व त्यातील १० हजार रुपये काढून घेत. त्यानंतर पुढे पैसे काढताना तो मशीनमध्ये छेडछाड करीत व पैसे काढून घेत होते. मात्र, बँकेकडे अयशस्वी ट्रान्झक्शन अशी नोंद होत असत. त्यानंतर तो बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन पैसे मिळाले नसल्याचे सांगत होते. त्यानुसार बँक त्यांच्या खात्यात ते पैसे परत टाकत असे, अशाप्रकारे त्यांनी आतापर्यंत १७ लाख रुपयांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.