पुणे :परंपरागत पद्धतीने व नियमानुसार चालत आलेल्या पालखी सोहळ्यात कोणत्याही संघटनेकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करतील असा थेट इशारा माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिला आहे. शिवाय अशा संघटनांना रोखण्यासाठी अधिक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही वर्षांपासून संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठानचे धारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील वर्षी शहरातील शिवाजीनगर भागात शंभरपेक्षा अधिक धारकरी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. मात्र स्वतः गुरुजी यांनी पालखीचे दर्शन घेतले होते. त्यावेळीही परंपरा मोडल्याचे मत व्यक्त करत पालखी प्रमुख आणि काही वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा हा भक्ती शक्तीचा संगम होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेपालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभुमीवर नुकतीच पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम् यांनी दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रमुखांसह, मानकरी, चोपदार व विश्वस्तांची पोलिस अधिकार्यांसह एकत्र बैठक घेतली. यावेळी शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत पालखी मार्गात प्रवेश करुन अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पालख्यांना निर्धारीत ठिकाणी पोहचण्यास विलंब होतो असे म्हणत, पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण करणार्यांची योग्य ती खबरदारी पोलिसांनी घ्यावी अशी मागणी प्रमुखांच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे या मागणीची दखल पोलिसांनी घेतली असून, संभाव्य प्रकार टाळण्यासाठी पोलिसांच्या वतीने खास तयारी करण्यात आली आहे. तसेच त्यासाठी वेगळा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.