पुणे : सदाशिव पेठेत भररस्त्यात महाविद्यालयीन तरुणीवर झालेला हल्ला तसेच वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा, पोलिस ठाण्यातील तपास पथके, तसेच गस्त घालणाऱ्या पथकांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सूचना करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी आपला मोबाइल नंबर जाहीर केला असून त्यावर व्हॉट्सॲप मेसेज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात गस्त घालणाऱ्या महिला पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्यात येणार आहे. अनुचित प्रकार घडल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलीस दलात प्रत्येकाला पिस्तूल, बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या पोलिसांचा नियमित सराव नसतो. पिस्तूल चालविण्याचा सराव पोलीस कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदाच करावा लागतो. शहरात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे दामिनी पथकासह गुन्हे शाखा, तसेच पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
वाहनांची तोडफोड, कोयते उगारुन दहशत माजविणे, महिलांची छेड काढण्याचे गुन्हे घडल्यास त्वरित कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. शहरातील गुन्हेगारांची यादी तयार करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
शस्त्रसज्ज पोलिसांचा वावर दिसल्यास गुन्हेगारांना धाक बसतो. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना तयार होते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी तपास पथकासह, दामिनी पथकातील महिला पोलिसांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना पिस्तूलही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पोलिस आयुक्तांचे आवाहन
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांनी नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन केले आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या व्हाॅट्सॲप क्रमांकावर (८९७५९५३१००) संदेश पाठवावा. नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी (११२) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार केल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कळविले आहे.
महिलांसंबंधित गुन्हे
प्रकार जून २३ अखेर जून २२ अखेर
विवाहितेला क्रुर ३१२ २०१
वागणूक
बलात्कार १७७ १५१
विनयभंग ३७७ २७८
अपहरण ४१६ ३७०
...........................................................................................
१२८२ १०००