पुणे इंटरनॅशनल सेंटर या संस्थेने काही पर्यावरण प्रेमी संस्थांना एकत्र करून पुणे शहराचा पर्यावरण अहवाल तयार केला. त्याचे नुकतेच प्रकाशन झाले. या टीमचे नेतृत्व करत असलेले संरक्षण तंत्रज्ञ व हरित तंत्रज्ञान सल्लागार पद्मश्री प्रा. अमिताभ मलिक यांच्याशी राजू इनामदार यांनी साधलेला संवाद
* प्रदुषण सर्वच प्रकाराचे होत असताना ‘कार्बन’ चा वेगळा अहवाल कशासाठी?अमिताभ- प्रुदषणात कार्बनचे प्रदुषण अधिक घातक आहे. ते मानवाची प्रतिकार शक्ती कमी करते. वातावरणातील उष्णता वाढवतो. पाणी कमी करते. जगभरात सगळीकडे हे अनिष्ट परिणाम दिसत आहेत. त्याच्या विरोधात काम करणे गरजेचे असल्याबाबत जगात एकमत झाले आहे. कोणत्याच देशाला असे नाही तर संपुर्ण मानव जातीलाच हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे हे प्रमाण परवडणारे नाही. आपल्याला या गोष्टी लगेच जाणवत नव्हत्या, मात्र आता प्रदुषणाचा वेग इतका वाढला आहे की काही देशांमधील अनेक शहरांना पाण्याचा तुटवडा, उष्णतेमधील वाढ हे ठळकपणे जाणवू लागले आहे. त्यातही भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशाला तर या उष्णतेला तोंड देताच येणार नाही. उष्णता वाढणार, पाणी कमी पडणार, त्यातून दुष्काळ येणार, शेतीत काही पिकणारच नाही. शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशात असे होणे म्हणजे संकट येणेच आहे. या संकटाची चाहूल ज्यांना लागली ते एकत्र येऊन काम करत आहेत. पुण्याचा असा अहवाल तयार करण्याचे तेच कारण आहे.
* पुणे शहरातील कार्बनचे प्रमाण काय आहे?-- पार्टस पर मिनिट या एककामध्ये कार्बनची पातळी मोजतात. हवेतील कार्बनचे कण श्वासाद्वारे आत जातात त्यावरून ती मोजतात. ती ३०० पेक्षा वर जाऊ नये, गेल्यास चिंताजनक समजतात. पुणे शहरात साधारण २० वर्षांपुर्वी ती २८० होती. आता ४१३ झाली आहे. युनोने ती जागतिक स्तरावर ४१५ मोजली आहे, म्हणजे आपण जगाच्या जवळ चाललो आहोत. जगात कार्बन निर्मितीत भारताचा चौथा क्रमांक आहे. त्यात पुणे इतक्या जवळ गेले आहे. ही स्थिती नक्कीच चांगली नाही तसेच चिंताजनकही आहे.कार्बन फुट प्रिंट म्हणून प्रत्येक व्यक्ती किती कार्बन तयार करते हेही मोजता येते. ती व्यक्ती दिवसभरात वीज, वाहने याचा किती वापर करते यावरून ते मोजतात. सन २०११-१२ मध्ये पुण्यातील हे प्रमाण वार्षिक माणशी १.४६ टन इतके होते. सन २०१७-१८ मध्ये ते १.६४ टन वार्षिक असे झाले आहे. फक्त ५ वर्षात १२ टक्केचा फरक पडला आहे. इतका वेग धोकादायक आहे.
* कशामुळे होते असे? विजेचा बेसुमार वापर, वाहनांचा वापर, औद्योगिक क्षेत्राची वाढ यातून हवेतील कार्बन डाय आॅक्साईडचे प्रमाण वाढते. झाडे कार्बन शोषून घेतात, मात्र आपण झाडेही तोडत आहोत. त्यामुळेच पुण्यासारख्या एकेकाळी चांगल्या हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या शहराची हवा आज संपुर्ण खराब झाली आहे. पाऊस कमी झाला, उष्णता वाढली असे आपण जे म्हणतो व गेल्या काही वर्षात पुण्यात जे जाणवते आहे त्याचा हा परिणाम आहे. माणशी एक वाहन आज पुण्यात आहे. गरज नसतानाही वाहनांचा वापर होते. सार्वजनिक प्रवासी वाहतूक चांगली नाही हेही एक कारण त्यामागे आहे. पेट्रोल, डिझेल इतके वापरले जाणे शहरासाठी हानीकारक आहे. यातून हवेतील प्रदुषण वाढते. पुण्यातील हवेने आता धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे शास्त्रशुद्धपणे सिद्ध झाले आहे.
* यातून मार्ग कसा निघेल?-- सकारात्मक असले पाहिजे. पुढच्या पिढीच्या भविष्याचा आपण आज विचार केला नाही तर त्यांचे जगणे अवघड होईल इतक्या वेगाने प्रदुषण वाढते आहे. प्रतिकार शक्ती कमी होणे, निरनिराळे आजार होणे याचे प्रमाण आज बरेच आहे. हा सगळा प्रदुषणाचाच परिणाम आहे. त्यामुळे यावर जनजागृती करणे, प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यातील धोका जास्तीत जास्त नागरिकांसमोर आणणे ही जबाबदारी पर्यावरणप्रेमी संस्था, संघटनांनी स्विकारली आहे. त्यांना साथ देण्यासाठी नागरिकांनीही आता एकत्र येऊन अशा पद्धतीची कामे केली तर प्रदुषणावर मात करणे शक्य आहे.