पुणे : पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलाने असे कृत्य केले असते तरी कारवाईचे आदेश दिले असते, अपघात प्रकरणाची चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाच्या कारच्या धडकेत दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला. अपघातानंतर अवघ्या पंधरा तासांत अल्पवयीन मुलाला सशर्त जामीन मिळाला. या सर्व प्रकरणानंतर आता लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिसदेखील ॲक्शन मोडवर आले आहेत.
हे प्रकरण दाबण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केले गेले. मात्र, टिंगरे यांनी हे आरोप बदनामी करण्यासाठी होत असल्याचे म्हटले. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाबाबत पुणेपोलिस आयुक्तांना फोन करीत चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या, असे आदेश दिले आहेत. “पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलाने असे कृत्य केले असते तरी कारवाईचे आदेश दिले असते,” असेही ते म्हणाले.