"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 02:24 PM2024-05-28T14:24:34+5:302024-05-28T14:28:58+5:30
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत.
पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर रोज नवीन खुलासे होत आहेत. काल डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलल्याचे समोर आले. बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांपासून ते शासकीय रुग्णालयातील यंत्रणाही कामाला लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आरोप केले आहेत. या प्रकरणी अजित पवार यांचा मोबाईल जप्त करुन त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
"एखादा पालकमंत्री एवढा अॅक्टिव्ह असतो की सकाळी लवकर उठून कामांची पाहणी करतो. मी काम करतो असं अजित पवार नेहमी सांगतात, मग असा कामाचा माणूस एवढी मोठी घटना घडल्यानंतर कुठे होते. या प्रकरणावर दिल्लीतील लोकही जागे झाले आहेत. काल या प्रकरणावर बोलताना त्यांची बॉडी लैंग्वेज काय होती?, जर त्यांच्यावर आरोप झाला की तुम्ही सीपींसोबत बोललात की नााही? तर त्यावर नाही मी सीपींसोबत बोलणार, मी काय शिपायांसोबत बोलणार आहे का? जे अजित पवार नेहमी भडकून बोलतात ते अजित पवार काल ज्या पद्धतीने बोलत होते. ते त्यावरुन सावरासावर करत असल्याचे दिसत आहे. ते कालच्या पत्रकार परिषदेत गांगरल्या सारखे वागत होते, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.
"त्यांनी सीपींना फोन केला की नाही याचं उत्तर द्याव, आता तुम्ही सीपींनाही याबाबत विचारलं पाहिजे. आमदार टिंगरे तिथे काय करत होते, कोणाच्या सांगण्यावरुन आले होते? हे आता टिंगरेंना विचारलं पोहिजे, आता अजित पवार यांचा फोन जप्त करुन त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली.
पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला
पोर्शेची टीम आरटीओसोबत मिळून या कारची तपासणी करत आहे. कारची अशी तपासणी प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर मर्सिडीज कंपनीने केली होती. यामध्ये कारचा अपघातावेळचा वेग, कितीवेळा किती वेगाने कार चालविली, हार्ड ब्रेकिंग, सीटबेल्ट लावला होता का अशा अनेक गोष्टींचा डेटा जमा करण्यात आला होता. या अलिशान कंपन्यांच्या कारमध्ये चिप लावलेल्या असतात. त्यामध्ये हा डेटा सेव्ह केलेला असतो. आता इलेक्ट्रीक स्कूटरमध्येही अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.
पोर्शे कंपनीचे तंत्रज्ञ या कारची तपासणी करत आहेत. यामध्ये बिल्डर बाळाने अपघात केला तेव्हाचा कारचा असलेला वेग, वेळ, कितीवेळा कार हार्ड ब्रेकिंग करण्यात आली, कितीवेळा वेगाने चालविण्यात आली याचा डेटा या आरटीओला दिला जाणार आहे. तसेच कारमध्ये इनबिल्ट डॅशकॅम होते. त्याचेही रेकॉर्डिंग मिळविण्यात आले आहे.