पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी क्राईम ब्रांच वेगाने कारवाई करत आहे. आता या प्रकरणाशी संबंधित एक मोठी अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणेपोलिसांनी ड्रायव्हर गंगारामचा मोबाईल जप्त केला आहे. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हरचं अपहरण करताना त्याचा फोन हिसकावला होता. आता ड्रायव्हरचे अपहरण आणि आरोप आपल्यावर घेण्याचा दबावाबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांनी ड्रायव्हर गंगारामचा फोन जप्त केला आहे. जो अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी गंगारामचं अपहरण करताना हिसकावून घेतला होता. अपघातानंतर अपहरण होईपर्यंत विशाल अग्रवाल आणि गंगाराम यांच्यात विशालने पाठवलेले काही मेसेज या फोनमध्ये आहेत. या प्रकरणाशी संबंधित हा महत्त्वाचा पुरावा असल्याचं पुणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
जामीन अर्जावरील सुनावणी १ जूनपर्यंत पुढे ढकलली
बाल न्याय कायद्याच्या कलमांतर्गत विशाल अग्रवालच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने ७ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. विशालला जेजे कायद्याच्या कलम ७५ आणि ७७ च्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि नंतर कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी दंडाधिकारी कोठडीत केली.
चालकाचे अपहरण केल्याचाही आरोप
या प्रकरणी ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात ड्रायव्हर गंगारामचं अपहरण करून त्याला त्यांच्या बंगल्यात ओलीस ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या दोघांविरुद्ध आयपीसी कलम ३६५ आणि ३६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल म्हणजेच मुलाच्या आजोबांनाही अटक केली.
ड्रायव्हरला दाखवलं पैशांचं आमिष
सुरेंद्र अग्रवाल यांनी सर्वात आधी त्यांचा ड्रायव्हर गंगारामला घरी बोलावलं. त्याला भरमसाठ पैशांचे आमिष दाखवून पोलीस ठाण्यात जाऊन भीषण अपघाताच्या वेळी तो पोर्शे कार चालवत होता, असं सांगायला सांगितलं. यानंतर गंगारामला गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेलं. जबाब नोंदवून घेतला. ते घरी परत आले. मात्र कटाचा एक भाग म्हणून गंगारामला घरी सोडण्याऐवजी बंगल्यात डांबून ठेवलं. एवढंच नाही तर सुरेंद्र अग्रवाल यांनी गंगारामचा कोणाशीही संपर्क होऊ नये म्हणून त्याचा फोनही हिसकावून घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दारू पिऊन बारमधून बाहेर आला तेव्हा ड्रायव्हर गंगारामने त्याचा बॉस विशाल अग्रवालला फोन करून सांगितलं की, मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवण्याचा प्रयत्न करत आहे. हे योग्य नाही. पण हे कळल्यानंतरही विशाल अग्रवालने ड्रायव्हरला गाडीची चावी आपल्या मुलाला देण्यास सांगितलं. यानंतर अपघात झाल्याची माहिती अग्रवाल कुटुंबियांना समजताच विशाल आणि त्याच्या पत्नीने तात्काळ ड्रायव्हर गंगारामला फोन करून दोष स्वत:वर घेण्याचे आदेश दिले आणि त्याबदल्यात पैसे मिळतील असं सांगितलं.
या अपघातात दोन जणांचा मृत्यू
या अपघातात अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला. दोघेही बाईकवरून जात असताना रस्त्यात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका पोर्शे कारने त्यांच्या गाडीला धडक दिली. अश्विनीचा जागीच मृत्यू झाला, तर अनिशला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे काही वेळाने त्याचाही मृत्यू झाला.