Pune Porsche Accident News पुण्यातील कल्याणीनगर भागात बिल्डरच्या अल्पवयीन बाळाने दारुच्या नशेत केलेल्या पोर्शे अपघात प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. बाळ दारुच्या नशेत नसल्याचे दाखविण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे सॅम्पलच बदलल्याचे समोर आले आहे. या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
बिल्डरच्या प्रतापी बाळाला वाचविण्यासाठी पोलिसच नाहीत तर ससूनची यंत्रणाही कामाला लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांचा बळी घेतला होता. या प्रकरणी त्याला वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचा आमदार पोलीस ठाण्यात आला होता. पोलिसांनी या बाळावरील गुन्हे साधक-बाधक कलमे टाकून कमी करण्याचे प्रयत्न केले होते. तसेच अपघाताच्या तब्बल पाच तासांनी या बाळाची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट करत त्याची दारु पिल्याची टेस्ट निगेटिव्ह कशी येईल हे पाहिले होते. या प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि सीएमओ (कॅज्युअलटी विभाग) डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे.
याचा परिणाम म्हणून बिल्डरच्या बाळाला १५ तासांत जामीनही मिळाला होता. या प्रकरानंतर जनक्षोभ उसळल्यामुळे पोलिसांची आणि बाल न्यायालयाची नाचक्की सुरु झाली होती. काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आवाज उठविण्यास सुरुवात करताच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल झाले होते. यानंतर प्रकरण शेकतेय हे पाहून पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. तोवर खूप उशीर झाला होता. बिल्डर विशालल अग्रवाल हा छत्रपती संभाजीनगरला पळून गेला होता. तर बाळाचा आजोबा पुरावे नष्ट करण्याचे, ड्रायव्हरला अपघात त्याच्या माथ्यावर घेण्याचे प्रयत्न करत होता.
आज बिल्डर विशाल अग्रवाल याच्यासह आजोबा सुरेंद्रकुमार याला अटक करण्यात आली असून बाळही बालसुधार गृहात आहे. अशातच बाळाला नशेत नसल्याचे दाखविण्यासाठी अग्रवालांना मदत करणाऱ्या दोन डॉक्टरांनाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीत बाळ दारु पित होते, पण टेस्टमध्ये ते निगेटिव्ह आल्याने मोठी टीका झाली होती. यामुळे पुणे पोलिसांनी बाळाची ब्लड टेस्ट केली होती. ससूनमध्ये ही टेस्ट झाली होती. यातही बाळाला वाचविण्यात आले होते. डॉक्टरांनी हे रक्ताचे नमुनेच बदलले होते. सात दिवस उलटले तरी रक्ताचे नमुने येत नसल्याने पोलिसांनी चौकशी केली. यावेळी रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचे समोर येताच ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. अजय तावरे यांच्यासह आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.