पुणे : भरधाव कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीच्या हातून गंभीर गुन्हा घडलेला असतानाही येरवडा पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच नातेवाइकांकडून पिझ्झा बर्गर देऊन ‘त्याची’ सरबराई केली जात होती. पोलिस केवळ बघ्याच्या भूमिकेत हाेते. त्यांच्यावर पोलिस आयुक्तांकडून कारवाई होणार का? असा प्रश्न केला जात आहे.
अल्पवयीन मुलाच्या हातून गंभीर गुन्हा घडला असतानाही बांधकाम व्यावसायिकाच्या नातेवाइकांकडून येरवडा पोलिस ठाण्यातच त्याला पिझ्झा बर्गर देण्यात आला. मुलाचे नातेवाईक पोलिस ठाण्यात खुर्चीवर बसले होते. मात्र, परराज्यातून आलेल्या मृताच्या नातेवाइकांवर धावाधाव करण्याची वेळ आली होती. काहीच झाले नाही अशा तोऱ्यात बांधकाम व्यावसायिक आमदाराला घेऊन पोलिस ठाण्यात आले होते.
मृताचे नातेवाईक म्हणाले की, अपघात केलेल्या मुलाला नागरिकांनी मारहाण केल्यावर पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याला तेथे एखाद्या व्हीआयपीप्रमाणे ट्रिटमेंट मिळत होती. पिझ्झाचे बॉक्स मागविण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याला झोपण्याचीही परवानगी देण्यात आली होती. मुलाच्या चेहऱ्यावर आपण काही गंभीर अपराध केला आहे असे कोणतेच भाव नव्हते.
कल्याणीनगर येथील नागरिक मृतांसाठी कँडल मोर्चा काढतात, लाेकप्रतिनिधींकडे मात्र मृतांच्या नातेवाइकांना भेटायला वेळ नाही. एकही लोकप्रतिनिधी भेटायला आला नाही. केवळ पोलिस आयुक्तांच्या एसी रूममध्ये बसून अपघातावर चर्चा केली, निवेदने दिली. कुणी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, पोलिसांनीही नातेवाइकांना मुलाला "पिझ्झा बर्गर' आणून देण्याची परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पोलिसांकडून सामान्य आरोपींना अशी वागणूक कधी दिली जाते का? बघ्याची भूमिका घेणाऱ्या या पोलिसांवर पोलिस आयुक्त कोणती कारवाई करणार? असा प्रश्न पुणेकरांनी उपस्थित केला आहे.