Pune Porsche Accident :पुणे पोर्श अपघातात प्रकरणात रोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात आठवड्याभरापूर्वी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यपान करुन भरधाव वेगाने कार चालवत दोघांची हत्या केली. या सगळ्या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीला काही तासांमध्येच जामीन मिळाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा सुनावणी घेतल्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. अशातच आता अल्पवयीन आरोपीचा अल्कोहोल टेस्टचा रिपोर्ट नेगेटिव्ह यावा यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी त्याचे रक्ताचे नमुनेच बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पुणेपोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवण्याचा अड्डा असा सवाल विरोधी पक्षाने केला आहे.
अल्पवयीन आरोपीचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये न पाठवता ते कचऱ्याच्या पेटीत टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ श्रीहरी हळनोर यांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने कचऱ्यात टाकले आणि त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने लॅबमध्ये पाठवून दिले. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली आहे. दुसरीकडे आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणामध्ये पोलिस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
ससून हॉस्पिटल आरोपींसाठी आहे का? - विजय वडेट्टीवार
"पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे? आधी ललित पाटीलचे धंदे याच हॉस्पिटल मधून सुरु होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते हे महाराष्ट्राला माहिती आहे. आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केली. हे हॉस्पिटल गुंड आरोपी यांच्यासाठी आहे का? ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती, पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने ह्या शंकेवर शिक्कमोर्तब केले. पुणे 'हिट अँड रन' प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे. दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे. या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत. पोलिस ते हॉस्पिटल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे," असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
डॉक्टरांचा सहभाग कसा उघड झाला?
अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हळनोर यांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले आणि त्याजागी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवून दिले. अपघातानंतर अल्पवयीन मुलाला तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पण तेच नमुने चाचणीसाठी न पाठवता ते कचरा पेटीत टाकण्यात आले. ससूनमधील पहिल्या सॅम्पलमध्ये अल्पवयीन मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे पोलिसांचा दुसऱ्यांदा ब्लड सॅम्पल घेतले आणि औंधमधील सरकारी रुग्णालयात पाठवले. त्यावेळी औंध रुग्णालयात वडील आणि मुलगा दोघांचे नमुने नमुने जुळले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि अधिक तपास केला. तपासात डॉक्टरांनी नमुने बदलल्याचे सष्ट झालं.