- हेमंत बावकर
बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने मद्यधुंद अवस्थेत दोघांचा जीव घेतल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. दोन पोलीस, बिल्डर, त्याचा बाप आणि बिल्डरच्या बाळाला दारु देणारे बार मालक व मॅनेजरला पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच त्या पट्ट्यातील अनधिकृत क्लबवर कारवाई करण्यात आली आहे. अशातच मद्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून अबकारी विभागाचीही झोप उडाली आहे.
पुण्यात वाईन शॉप, बिअर शॉप वाले जे अगदी चार-पाच दिवसांपर्यंत येईल त्याला दारु विकत होते, ते आता आलेल्या गिऱ्हाईकाला तो कोवळा वाटत असल्यास तुला दारू मिळणार नाही असे सांगत माघारी पाठवत आहेत. तसेच मोठ्या व्यक्तीला घेऊन ये मग देतो असेही सांगितले जात आहे.
पुण्यातील सर्रास मद्य विक्रीच्या दुकानांवर एक बॅनर लावण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार दारु विक्रीच्या अटी आणि नियम देण्यात आले आहेत. बिल्डर बाळाला दारु दिल्याने त्या क्लबचा मालक, मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. यावरून आपल्यावरही कारवाई होऊ शकते, लाखो करोडो मोजून मिळालेले वाईन शॉप, बिअर शॉपचे लायसन जाऊ शकते. तसेच रोजची लाखोंची कमाईही जाऊ शकते अशी भीती या दुकानदारांना वाटू लागली आहे.
यामुळे आलेले गिऱ्हाईक कधी नव्हे ते माघारी पाठविण्यात येऊ लागले आहे. या नियमांमध्ये २१ वर्षांखालील व्यक्तीला दारु दिली जाणार नाही असे स्पष्ट म्हटलेले आहे. तर २१ ते २५ वयोगटातील व्यक्तींना सौम्य बिअर विकली जाणार आहे. तसेच २५ वर्षांवरील व्यक्तींना सर्व प्रकारचे मद्य म्हणजेच व्हिस्की, रम, व्होडका, बिअर आदी विकले जाणार आहे.
यातही पळवाटा...एकंदरीतच बाळाच्या प्रतापाने अन्य बाळांच्या तलफेवर लगाम लावल्याचे काम केले आहे. आता या नियमांतही पळवाटा आहेत. मोठ्या व्यक्तीला दारु घेण्यास लावून ती दारू हे अल्पवयीन, २१ वर्षांखालील किंवा २५ वर्षांखालील व्यक्ती घेण्याची शक्यता आहे. परंतु काही अंशी का होईना हे नियम लागू केल्याने व सध्यातही वाईन शॉपवाले ते पाळत असल्याने लहान वयातील मद्यशौकिनांची अडचण होऊ लागली आहे.