पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आता वेगवेगळे ट्विस्ट येऊ लागले आहेत. आरोपी अग्रवाल कुटुंबाकडून पोलिस तपास भरकटविण्यासाठी आणि मुलाला सोडविण्यासाठी वेगवेगळे दावे केले जाऊ लागले आहेत. सुरुवातीला मुलाला चावी मीच दिली हे मान्य करणारे आता तो गाडी चालवतच नव्हता, ड्रायव्हर चालवत होता असे सांगून त्या गरीब ड्रायव्हरला अडकवायचा प्रयत्न करू लागले आहेत. आता तर बिल्डर बाप आणि छोटा राजनशी संबंध असल्याचा आरोप असलेला आजोबा देखील बाळाला आपणच चावी दिल्याचे पोलिसांना सांगत आहेत.
बिल्डरचा बाळ दारु पिऊन गाडी चालवत होता. त्याने कल्याणीनगरमध्ये दोघांना उडविले यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर जमावाने कार चालविणाऱ्या बाळाला पकडून चांगला चोप दिला. या बाळाला सोडविण्यासाठी एका फोनवर आमदार पोलीस ठाण्यात हजर झाला. १५ तासांत बिल्डर बाळाला निबंध लिहिण्याच्या आणि १५ दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत राहून वाहतूक नियमन करण्यासारख्या हास्यास्पद अटी घालण्यात आल्या होत्या. यावरून पुण्यासह महाराष्ट्रभरात जनक्षोभ उसळला होता. यानंतर पोलीस प्रशासनाने नाचक्की होतेय हे पाहून धावाधाव करण्यास सुरुवात केली होती.
आता पोलिस नेमकी चावी कोणी दिली, याचा शोध घेणार आहेत. गुरुवारी बिल्डर विशाल अग्रवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची ड्रायव्हरसमोर समोरासमोर पोलिसांनी चौकशी केली. तसेच आजोबा सुरेंद्र कुमार यांची छोटा राजनशी संबंध असल्याचीही चौकशी करण्यात आली. यावेळी आजोबांनी बाळाला मीच कारची चावी आणि दारुवर पैसे खर्च करण्यासाठी क्रेडिट कार्ड दिल्याचे म्हटले आहे. तर बिल्डर विशाल अग्रवाल याने आधीच मी मुलाला पोर्शे कारची चावी देऊन चूक केल्याचे पोलिस तपासात कबुल केले आहे. यामुळे कोण कोणाला वाचवतेय असा प्रश्न पोलिसांसमोर पडला आहे.
पोलिसांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन बाळाने पार्टीला जाण्यापूर्वी आजोबांना सांगितले होते. यानंतर आजोबांनी विशाल अग्रवालला फोन करून पोर्शे कारची चावी आणि पार्टी करण्यासाठी क्रेडिट कार्ड दिले होते, असा दावा आजोबांनी केला आहे. आता कोण कोणाला वाचवतेय, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.