पुणे : मद्यपान करून पाेर्शे कार भरधाव चालवीत दोन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला प्रौढ समजून त्याच्यावर खटला चालविण्याबाबतचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अपघातानंतर मुलाला जामीन मिळाल्यावर दोन सदस्यांवर प्रक्रियात्मक त्रुटी, गैरवर्तन आणि नियमांचे पालन न केल्याबद्दलचा ठपका ठेवत त्यांची सेवा रद्द करण्याची कारवाई केली होती. त्यामुळे बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची जागा रिक्त होती. या रिक्त पदांवर दोन नवीन सदस्यांची नियुक्ती केल्याने मुलाला प्रौढ म्हणून खटला चालविण्यावर निर्णय होऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
कल्याणीनगर परिसरात १९ मे २०२४ रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका भरधाव आलिशान पोर्शे कारने दोन आयटी अभियंता तरुण-तरुणीला उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही कार पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा १७ वर्षीय ८ महिन्यांचा मुलगा मद्यप्राशन करून चालवत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात प्रथम त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळात हजर केल्यानंतर त्याला निबंध लिहिण्याच्या अटीवर अवघ्या १५ तासांत जामीन मिळाला होता. पोलिसांनी बाल न्याय मंडळाच्या हा निर्णय आश्चर्यकारक व धक्कादायक असल्याची भूमिका घेत वरच्या कोर्टात दाद मागितली; परंतु पुन्हा याबाबत बाल न्याय मंडळातच आपली दाद मागण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी सर्व पुराव्यांनिशी मुलाला पुन्हा बाल न्याय मंडळात हजर केले.
पोलिसांनी भक्कमपणे बाजू मांडत मुलावर प्रौढ म्हणून खटला चालविण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे अर्ज दाखल केला. दरम्यान, मुलाला जामीन दिल्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेत राज्य महिला आणि बाल विकास विभागाने चौकशी समिती नेमली होती. या समितीने एल. एन. दानवडे आणि कविता थोरात या दोन सदस्यांविरुद्ध ‘प्रक्रियात्मक त्रुटी, गैरवर्तन आणि नियमांचे पालन न केल्याबद्दल’ कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार एका अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने येथील बाल न्याय मंडळाच्या (जेजेबी) दोन सदस्यांच्या सेवा रद्द केल्या. चार महिन्यांपासून दोन सदस्यांची पदे रिक्त होती. या रिक्त पदांवर दोन नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याने मुलावर प्रौढ म्हणून खटला चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.