पुणे : कल्याणीनगर अपघातप्रकरणी चर्चेत आलेल्या सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल या बाप-लेकासह ५ जणांवर कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अग्रवाल बाप-लेकाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाने ९ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी विनय विष्णुपंत काळे याच्यावर जानेवारीत महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्रकुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल, सीईओ रवी हुडलाणी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर भादंवि ३०६, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चंदननगर पोलिसांनी दिली.
शशिकांत दत्तात्रय कातोरे (४१, रा. गार्डेनिया सोसायटी, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रय साहेबराव कातोरे (६९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनय काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शशिकांत यांचा ‘सद्गुरू इन्फ्रा’ या नावाने कन्स्ट्रक्शन व्यवसाय होता. त्यांना व्यवसायासाठी बँकेचे कर्ज आवश्यक होते. त्यासाठी ते बँकेच्या शोधात होते. याच काळात काळे आणि शशिकांतची ओळख झाली. त्याने ‘तुम्ही बँक लोनच्या भानगडीत पडू नका. मी तुम्हाला पैसे देतो. तुम्ही मला त्यावर पाच टक्क्यांच्या हिशेबाने परतावा द्या’ असे सांगितले. शशिकांत यांनी काळे यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्याला ठरल्याप्रमाणे पाच टक्क्यांप्रमाणे वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरूपात पैसेदेखील दिले.
मागील काही महिन्यांपूर्वी शशिकांत यांनी नवीन साईट चालू करण्यासाठी काळेकडून परताव्याच्या पाच टक्के दराने पुन्हा पैसे घेतले. परंतु, ही साईट चालू झाली नाही. त्यानंतर काळे याने या रकमेवर चक्रवाढ व्याज लावण्यास सुरुवात केली. या सर्व पैशांची मागणी सुरू केली. शशिकांतच्या घरी जाऊन त्यांना ‘आम्हाला पैसे दिले नाही तर, तुम्हाला तुरुंगात पाठवतो’ अशी धमकी दिली. याला कंटाळून शशिकांत कातोरे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलिस करीत आहेत.