पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून मोटार भरधाव चालवल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. यात आराेपी मुलाच्या रक्ताचे दोन नमुने घेण्यात आले होते. ससूनच्या नमुन्यात डाॅक्टरांनी फेरफार केल्याने त्यांना अटक करण्यात आली. मात्र, औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलेल्या रक्ताच्या नमुन्यातूनही मद्यांश नसल्याचे आढळून आले. अपघातानंतर दीड तासाच्या आत रक्ताचे नमुने न घेतल्याने रक्तात मद्यांश आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले.
कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन बाळाला ताब्यात घेण्यात आले. अपघातानंतर सकाळी नऊच्या सुमारास बाळाला ससून रुग्णालयात नेण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास रक्ताचे नमुने घेण्यात आले. ससून रुग्णालयातील प्राथमिक रक्त तपासणी अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना या अहवालाचा संशय आल्याने १९ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास औंध येथील जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन बाळाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. रक्ताच्या नमुन्याचे अहवाल रविवारी (दि. २६) पोलिसांना मिळाले. दोन्ही अहवालात मुलाच्या रक्तात मद्यांश आढळून आला नाही.
कारणे काय?
- अपघातानंतर साडेआठ तासांनी १९ मे रोजी सकाळी अकरा वाजता ससून रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर १८ तासांनी औंध रुग्णालयात सायंकाळी सातच्या सुमारास मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.
- गंभीर गुन्ह्यात आरोपीने मद्यप्राशन केल्याचा संशय असल्यास घटना घडल्यानंतर पहिल्या दीड तासात रक्ताचे नमुने घेणे आवश्यक असते. मद्यप्राशन केल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात २४ तास मद्यांश (अल्कोहोल) आढळून येते.
- मद्यप्राशन केल्यानंतर एखाद्याने पाव, चीझ सेवन केल्यास किंवा नैसर्गिक विधी केल्यास मद्यांशाचे प्रमाण कमी होत जाते. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटुंबीयांनी येरवडा पोलिस ठाण्यात पिझ्झा खाण्यास दिला होता. त्यामुळे त्याच्या रक्तातील मद्यांश कमी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.