पुणे : कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना १९ मे रोजी घडली होती. या वेळी आपण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे अल्पवयीन आरोपीने कबूल केले आहे. तसेच, अपघाताबद्दल फारसे काही आठवत नसल्याचेदेखील संबंधित मुलाने पोलिस चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, याला पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
पुणे पोलिसांनी शनिवारी (दि. १) बालगृहात आरोपीची आईच्या उपस्थितीत चौकशी त्याची केली. बाल न्याय हक्क मंडळाने ३१ मे रोजी पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी दिली होती.
मित्रांचीदेखील कबुली
घटनेच्या रात्री अल्पवयीन मुलाचे दोन्ही मित्र मागच्या सीटवर बसले होते. अल्पवयीन आरोपी मद्यप्राशन करून भरधाव कार चालवत होता, अशी माहिती अल्पवयीन आरोपीच्या मित्रांनी पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आरोपीच्या दोन्ही अल्पवयीन मित्रांना पोलिस साक्षीदार करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत पुणे पोलिसांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून त्यानंतर ते निर्णय घेणार आहेत.