पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणाला बुधवारी (दि. १९) एक महिना पूर्ण होत आहे. या महिनाभरात पुणे पोलिसांनी सखोल तपासणी अहवाल तयार करून बालन्याय मंडळास सादर केला आहे. या घटनेत नेमकं घडलं काय? कुणाचा होता सहभाग? आई-वडिलांनी मुलाच्या रक्ताचे नमुने कुठे आणि कसे नष्ट केले? याचा संपूर्ण वृत्तांत अहवालात मांडला आहे.
कल्याणीनगर येथे १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीस्वार सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यामध्ये या तरुण-तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. मुलाला १५ तासांत जामीन देण्यात होता. यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अर्ज करून अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजावे, यासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने पुणे पोलिसांना परत बाल न्याय मंडळात अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार पुणे पोलिसांनी मंडळात अर्ज केला असता अल्पवयीन मुलाला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यासंदर्भात दोनवेळा वाढ केली आहे. घटनेच्या एक महिन्याच्या आत बाल न्याय मंडळास अहवाल देणे बंधनकारक असतो. त्यामुळे पुणे पोलिसांनी हा अहवाल बाल न्याय मंडळास सुपूर्द केला आहे. अल्पवयीन मुलाचा मुक्काम २५ जूनपर्यंत बालसुधारगृहात वाढविण्यात आला आहे.
बदललेले रक्त फेकले बायोलॉजिकल वेस्टमध्ये :
अपघात झाल्यानंतर वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मुलाची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह यावी यासाठी ससूनमधील डॉक्टरांच्या मदतीने शिवानी अग्रवाल यांचे रक्त घेण्यात आले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अल्पवयीन मुलाचे रक्त हे बायो मेडिकल वेस्टमध्ये फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. ससूनमधील बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्याचे काम एक कंपनी करते. पोलिसांनी फेकून देण्यात आलेल्या मुलाचे रक्ताचे नेमके काय झाले याची माहिती कंपनीकडून घेत आहेत.
विशाल अग्रवालनेच दिले ते पैसे :
अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याला आरोपी अश्फाक मकानदार याने येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या परिसरात तीन लाख रुपये दिले होते. घटकांबळे याने यातील अडीच लाख रुपये डॉ. श्रीहरी हाळनोर आणि स्वतःकडे ५० हजार ठेऊन घेतले होते. डॉक्टरांना देण्यात आलेले तीन लाख रुपये विशाल अग्रवाल याने कल्याणीनगर येथील एका हॉटेलमध्ये अश्फाक मकानदार याला दिल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा सखोल तपासणी अहवाल बाल न्याय मंडळाला दिला आहे. त्यात अपघाताची संपूर्ण माहिती, हॉटेल आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, कारमध्ये सोबत असणारा चालक, कारमधील इतर दोन मुले, पार्टीमध्ये सहभागी असणारे त्याच्या सहकारी, प्रत्यक्षदर्शी ज्यांनी अल्पवयीन मुलाला कार चालवताना पाहिले होते यांचे सगळ्यांचे जबाब घेण्यात आले होते. ती माहिती, पोर्शे कार या सगळ्यांची विस्तृत माहिती बाल न्याय मंडळास देण्यात आली आहे.
- सुनील तांबे, तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा