Pune Porsche Case: पोलिस आयुक्तांना फोन करणारा ‘ताे’ आमदार कोण? संशयाची सुई पुण्यात अन् मुंबईतही

By राजू इनामदार | Published: May 27, 2024 07:02 PM2024-05-27T19:02:00+5:302024-05-27T19:04:59+5:30

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर समाज माध्यमावर पोस्ट करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे....

Pune Porsche Case Who is the MLA who called the police commissioner? Doubt in Pune and Mumbai too | Pune Porsche Case: पोलिस आयुक्तांना फोन करणारा ‘ताे’ आमदार कोण? संशयाची सुई पुण्यात अन् मुंबईतही

Pune Porsche Case: पोलिस आयुक्तांना फोन करणारा ‘ताे’ आमदार कोण? संशयाची सुई पुण्यात अन् मुंबईतही

पुणे : बड्या बापाच्या बिघडलेल्या पोराने मद्यप्राशन करून आलिशान पोर्शे कार भरधाव चालवत अभियंता तरुण-तरुणीचा बळी घेतला. या घटनेत एका आमदाराने पोलिस आयुक्तांना फोन केल्याचे निदर्शनास येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार सुनील टिंगरे घटना घडली त्याच मध्यरात्री ३ वाजता पोलिस ठाण्यात गेल्याचे तर सिद्ध झालेच आहे, पण फोन प्रकरणामुळे आता यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे सिद्ध होत आहे. यावरून संशयाची सुई पुण्यात तसेच मुंबईवर रोखली गेल्याचे दिसते आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर समाज माध्यमावर पोस्ट करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. पोलिस आयुक्तांनी त्यांना अजित पवार यांचा फोन आला होता की नाही? याबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी जाहीर मागणीच त्यांनी सोमवारी केली. फोन केला नसेल तर ठीक आहे, मात्र केला असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

अपघात घडल्यापासून या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्याच्या आरोपांना पुष्टी देणाऱ्या अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. आमदार टिंगरे घटना घडल्यावर मध्यरात्री ३ वाजता पोलिस ठाण्यात पोहचले. त्यानंतरच तिथे राजकीय दबावातून अनेक गोष्टी झाल्याचे निदर्शनास येते आहे. एकाच घटनेचे दोन एफआयआर होणे, आधी वेगळे कलम व नंतर वेगळे कलम लावले जाणे, अपघात केलेल्या बाल गुन्हेगारास पिझ्झा-बर्गर पुरविला जाणे, लगेचच त्याला बाल न्यायालयासमोर उभे करून एकाच न्यायाधिकाऱ्यांकडून जामीन मिळणे, या गोष्टी राजकीय हस्तक्षेपांशिवाय शक्य नाही, असेच दिसून येत आहे.

या प्रकरणाचा तपास जसा पुढे चालला आहे, तसतसे आणखी काही गोष्टी पुढे येत आहेत. विशेषत: बाळाच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल बदलला जाण्याचा गंभीर प्रकार घडल्याचे सिद्ध झाले आहे. कोणाच्या दबावातून हे केले गेले? ज्यांनी केले ते कोणाच्या राजकीय संपर्कातील आहेत? त्यांची सरकारी सेवेतील पार्श्वभूमी अशाच काही प्रकरणांची असताना त्यांना याआधी कोणी वाचविले? या प्रश्नांच्या उतारातून राजकीय नावेच समोर येत आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार या घटनेनंतर तब्बल आठ दिवसांनी पुण्यात आले. त्याआधी त्यांनी मुंबईतून या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नाही, असे सांगत आमदार टिंगरे तिथे लोकप्रतिनिधी म्हणून गेले होते, असे सांगून स्वपक्षीय आमदाराचा बचावही केला. आठ दिवसांनी पुण्यात आल्यावरही त्यांनी या घटनेवर जास्त भाष्य करण्याचे टाळत मी, मुंबईत मंत्रालयात बसून सगळी माहिती घेत होतो इतकेच सांगितले.

राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मात्र घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यात आले, पोलिस या प्रकरणाचा कार्यक्षमतेने तपास करत असल्याचे सांगत एकप्रकारे त्यांनी पोलिस आयुक्तांना शिफारसपत्र दिले. दोषींना शिक्षा व्हावी अशीच आयुक्तांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

सांत्वन नाही की, मदतीचा हात नाही :

मृत तरुण अभियंत्यांच्या नातेवाइकांचे साधे सांत्वन करण्याचे, किंवा त्यांना आवश्यक मदत करण्याचे सौजन्य फडणवीस यांनी दाखविले नाही. मग ते काय फक्त पोलिस आयुक्तांना प्रमाणपत्र देण्यासाठीच आले होते का?, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

आराेपींना वाचविण्याचाच प्रयत्न :

बाळाच्या रक्तचाचणीचा अहवाल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयांमधून दोन वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतका गंभीर प्रकार झाल्यानंतरही यात कोणाचाही राजकीय हस्तक्षेप नाही, असे समजणे म्हणजे आरोपी व त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मोकळे सोडणे असेच आहे, अशी चर्चा आता शहरात जोर धरत आहे.

रवींद्र धंगेकर आक्रमक :

स्थानिक स्तरावर काँग्रेसचे आमदार व पुणे शहर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दररोज या प्रकरणात आरोपांवर आरोप करणे सुरू केले आहे. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी महापौर व महायुतीचे पुणे शहर लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी पोलिस आयुक्तांना दोषींवर कडक कारवाई करण्याचे निवेदन दिले. मात्र त्यानंतर ते या प्रकरणावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत. भाजपचे स्थानिक पदाधिकारीदेखील धंगेकर यांच्या आरोपांच्या मालिकेवर शांतच आहेत.

Web Title: Pune Porsche Case Who is the MLA who called the police commissioner? Doubt in Pune and Mumbai too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.