पाेर्शे अपघाताने अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला आणले अडचणीत; भाजपची जागा फिक्स
By राजू इनामदार | Published: May 28, 2024 07:13 PM2024-05-28T19:13:30+5:302024-05-28T19:14:30+5:30
आमदारकी कशी व कुठे वापरायची हे कळत नाही का? अशा शब्दांमध्ये ते अजितदादांनी टिंगरेंना झापले
पुणे : बिल्डर बापाच्या अतिलाडक्या बाळाने आलिशान पोर्शे गाडी भरधाव वेगाने चालवत २ तरुण अभियंत्यांचे बळी घेतले. त्यावरील पोलिसी कारवाई सुरूच आहे, मात्र अपघातानंतर लगेचच पोलिस ठाण्यात गेलेल्या आमदार सुनील टिंगरे यांच्यामुळे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकीयदृष्ट्या चांगलाच अडचणीत आला आहे. विधानसभेच्या या जागेसाठी आग्रही असणाऱ्या भाजपचा दावा टिंगरे यांच्या उपस्थितीमुळे आता फिक्स झाला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विधानसभेच्या सन २०१९ च्या निवडणुकीत टिंगरे एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत भाजपचे तत्कालीन आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव करून निवडून आले. नंतरच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वत:चा आमदारांचा मोठा गट घेऊन बाजूला झाले. भाजपबरोबर युती करून ते सत्तेतही सहभागी झाले. आमदार टिंगरे अजित पवार यांच्याबरोबर राहिले. त्यामुळेच आता ही महायुती कायम राहिली, तर वडगाव शेरी विधानसभेची जागा कोणाला? असा प्रश्न उभा राहिला होता. टिंगरे यांच्या अपघातानंतरच्या पोलिस ठाण्यातील उपस्थितीने तो निकालात निघाला असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
पवारांचा एक ओळीचा खुलासा
अजित पवार यांच्यावरही टिंगरे यांच्या पोलिस ठाण्यातील उपस्थितीने शिंतोडे उडाले. ते टिंगरे यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच इतका भीषण अपघात झाल्यानंतर पालकमंत्री असूनही ते तब्बल ८ दिवस पुण्यात आलेच नाहीत. आमदार टिंगरे लोकप्रतिनिधी असल्यामुळे तिथे गेले, असा एका ओळीचा खुलासा त्यांनी मुंबईतून केला. ८ दिवसानंतर पुण्यात आल्यावरही त्यांनी अपघातावर फारसे भाष्य केले नाही. त्यामुळेच या प्रकरणातील त्यांच्या भूमिकेविषयी संशयाचे धुके उभे राहिले आहे. आता तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर पोलिस आयुक्तांना त्यांनी या प्रकरणासंदर्भात फोन केला असल्याचा आरोप केला आहे.
पाेलिस ठाण्यातील टिंगरेंची उपस्थिती भाजपच्या पथ्यावर
माजी आमदार जगदीश मुळीक यांनी पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. मात्र त्यांना यश मिळाले नाही. वडगाव शेरी हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ आहे. लोकसभेसाठी या आधी कायम या मतदारसंघातून भाजपला लक्षणीय मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक पदाधिकारी या मतदारसंघाबाबत फार आग्रही आहेत. म्हणूनच अजित पवार यांच्याबरोबर राज्यस्तरावर राजकीय गरजेतून युती करण्यात आली तरी या युतीला स्थानिक स्तरावर अजिबात मान्यता नाही. महायुतीच्या जागा वाटपात वडगाव शेरीसाठी आग्रही राहायचे हा निर्णय स्थानिक स्तरावर झालाच होता, तो आता टिंगरे यांच्या अपघातानंतरच्या पोलिस ठाण्यातील उपस्थितीने दृढ झाला असल्याचे दिसते आहे.
टिंगरे प्रकरणावर भाजपची ‘तेरी भी चूप..’
मतदारसंघात इतका मोठा अपघात झाला, त्यातून आमदार टिंगरे अडचणीत आले, मात्र तरीही याच मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या मुळीक यांनी त्यामुळेच मित्र पक्षाचा आमदार अडचणीत येऊनही मदतीसाठी धाव घेणे दूरच, एक चकार शब्दही काढलेला नाही. आपल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी या प्रकरणापासून कटाक्षाने दूर ठेवल्याचे दिसून येत आहे. बदलत्या राजकारणात विधानसभेच्या जागा वाटपामध्ये वडगाव शेरी मतदारसंघाची मागणी करणार का? या प्रश्नावर भाजपचा वडगाव शेरीमधील एकही पदाधिकारी बोलायला तयार नाही. स्वत: मुळीक यांनीही पक्षश्रेष्ठीच याबाबत बोलू शकतात असे उत्तर लोकमतला देत स्वत:चे मत व्यक्त करणे टाळले.
अजित पवारांनी टिंगरे यांना झापले : सूत्र
दरम्यान, अजित पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना या प्रकरणावरून बरेच बोल सुनावले असल्याची चर्चा आहे. त्याला दुजोरा मिळू शकला नाही, मात्र नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर राष्ट्रवादीमधील काही सूत्रांनी सांगितले की, अजित पवार यांनी टिंगरे यांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदारकी कशी व कुठे वापरायची हे कळत नाही का? अशा शब्दांमध्ये ते टिंगरे यांच्याबरोबर बोलले असल्याची माहिती या पदाधिकाऱ्यांनी दिली.