पुण्यातील वाडिया कॉलेजमधील प्राध्यापकाच्या मुलीवरील सामुहिक बलात्काराच्या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्तांना कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले आहे. या कॉलेजच्या प्रमुखपदी मंत्री उदय सामंत यांचा माजी ओएसडी असल्याचे सांगत त्याने प्राध्यापकाला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. तसेच वाडिया कॉलेजची विद्यार्थीनी असलेल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये बड्या व्यक्तींची मुले असल्याचे सांगत या उप जिल्हाधिकाऱ्यांचा मुलगा असल्याची दावा करण्यात आला आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
एकीकडे बदलापूरमधील लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्याचा इन्काउंटर झालेला असताना पुण्यात आता खळबळजनक घटना घडलेली आहे. वाडिया कॉलेजमधील दोन अल्पवयीन मुलींवर पाच जणांनी सामुहिक बलात्कार केल्याचे प्रकरणी धंगेकरांनी आवाज उठविला आहे.
या मुलींवर कॉलेजच्या आवारात वेळोवेळी सामुहिक बलात्कार करण्यात आले, तसेच त्याचे व्हिडीओ काढण्यात आले आहेत. सोशल मीडियावरून हे व्हिडीओ शेअरही करण्यात आले आहेत. यातील एक मुलगी ही वाडिया कॉलेजच्या प्राध्यापकाची आहे. त्याने तक्रार केली असता दोन्ही ट्रस्टी सचिन सानप व अशोक चांडक यांच्यासह प्राचार्यानी प्राध्यापकाला सक्तीच्या रजेवर जाण्यास सांगून संस्थेची बदनामी झाल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली आहे, असे धंगेकरांनी या पत्रात म्हटले आहे.
सानप हे मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी होते. ओएसडी असताना ते या संस्थेवर ट्रस्टी झाले. त्यांची भेट घेण्यासाठी पीडित मुलीचे प्राध्यापक वडील सानप यांच्या भेटीसाठी गेले होते. तिथे त्यांना तीन-चार तास बाहेरच ठेवण्यात आले. यानंतर दुपारी त्यांना आत बोलवून रात्री ११ वाजेपर्यंत तिथेच थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यांच्या मुलीचा कॉलेजमधील प्रवेश रद्द करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच तिचा प्रवेशही रद्द करण्यात आल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे.
बलात्कार करण्याच्या मुलांपैकी काही मुले ही बड्या असामींची आहेत. त्यातील एक हा उपजिल्हाधिकारी (प्रांत-अधिकारी) यांचा मुलगा आहे. सानप यांचे या उप जिल्हाधिकाऱ्यांशी मोठे आर्थिक संबंध आहेत. सानप हे त्यांच्या मुलाला वाचविण्याकरीता पीडित मुलीच्या वडिलांवर दबाव टाकत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरु असल्याचेही धंगेकर यांनी म्हटले आहे.