पुणे : पुणेरेल्वे विभागात अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध एप्रिल आणि मे महिन्यात विशेष मोहीम राबवण्यात आली. १ एप्रिल ते १४ मे दरम्यान पुणे रेल्वे स्थानकावरी ७४ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून २ हजार ७४८ अन्य कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या आणि निकृष्ठ दर्जाचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानकावर दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. रेल्वे स्थानकासह रेल्वेत अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह अनधिकृत विक्रेते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. रेल्वे प्रशासनातर्फे दरवर्षी अशाप्रकारे जुजबी कारवाई या विक्रेत्यांवर करण्यात येत असते, मात्र हे अनधिकृत विक्रेते ज्यांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय करतात, ते मात्र नामानिराळेच असतात. कारवाई केलेल्या ७४ अनधिकृत विक्रेत्यांव्यतिरिक्त आजही रेल्वे स्थानकावर अनेक अनधिकृत विक्रेते आढळून येतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नावापुरती कारवाई न करता कडक कारवाई नेहमी करण्याची गरज असल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले.
दरम्यान ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु राणी दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वाणिज्य व्यवस्थापक अजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी, खानपान निरीक्षक कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बल यांच्या पथकाद्वारे करण्यात आली. दरम्यान या लोकांना रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने अनधिकृत विक्रेत्यांना ४९ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.