पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे रेल्वे स्थानकावर नवीन सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात येत होती. पण या मागणीला गाजर दाखवण्यात येत होते. अखेर प्रवासी, रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांसह काही राजकीय पक्षांनी पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरत अल्टिमेटम दिल्याने नवीन सीसीटीव्हीसाठी रेल्वे बोर्डाने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता लवकरच पुणे रेल्वे स्थानकावर लवकरच १२० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
सध्या रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही नादुरुस्त, दर्जाहीन आणि अपुरे असल्याने रेल्वे स्थानकाची सुरक्षा धोक्यात आली होती. त्यामुळे वारंवार नव्या सीसीटीव्हींची मागणी करण्यात येत होती. सध्या असलेल्या ५९ सीसीटीव्हऐवजी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले १२० सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. रेल-टेलमार्फत हे सीसीटीव्ही बसवण्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
''रेल्वे प्रशासन पुण्यात २६/११ ची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहत आहे का? सीसीटीव्ही तर नाहीच पण येथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा चांगले काम करण्याच्या लायकीची राहिलेली नाही. पुणे रेल्वे स्थानकाला अतिरेकी हल्ल्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे रेल्वेने काही अनपेक्षित घडण्याआधीच सीसीटीव्ही बसवावेत. - निखिल काची, विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, पुणे विभाग''