मुळशी, खडकवासला, पानशेत आदी धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणक्षेत्रात तसेच पुणे शहर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे आठवडाभरापूर्वीची परिस्थिती पुन्हा उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशातच पुण्यातील नागरिकांनी सावध रहावे असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 27016 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 9:00 वा. 29414 क्यूसेक्स करण्यात आला आहे. तर पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे स.8 वा. पानशेत धरणाच्या 5853 क्यूसेक विसर्गमध्ये वाढ करून 7539 क्यूसेक सांडव्याद्वरे व 600 क्यूसेक विद्युत गृह निर्मिती द्वारे असा एकूण 8139 क्यूसेक करण्यात आला आहे.
मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीच्या पात्रात सुरू असलेला २४,७४५ क्युसेक्स विसर्ग स्थिर ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. मुळशी धरण 95% भरले आहे. आंद्र धरणात 100 % जलसाठा झालेला आहे. सांडव्यावरून अनियंत्रित 1982 Cusecs विसर्ग चालू आहे.
पुणे जिल्ह्यात असणाऱ्या धरणांच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने शहर आणि आसपासच्या भागात पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. आवश्यकता भासल्यास एनडीआरएफची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशीही माहिती अजित पवार यांनी दिली आहे.