पुणे :पुणे शहर व जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत गारांसह पाऊस पडण्याची शक्यता असून, हवामानशास्त्र विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. दिवसा आकाश ढगाळ राहणार आहे.
हवेचा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातून जात आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणात पुढील काही दिवस वाढ होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिवसा हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे व तापमानात वाढ झाल्यामुळे वातावरण अस्थिर बनले आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून कमाल तापमानात घट झाल्याने पुणेकरांना जरासा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात कमाल तापमान चाळीशीच्या पार गेले होते. परंतु, दोन दिवस पारा घसरून चाळीशीच्या खाली आला आहे. दरम्यान २६ एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यात गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट जाहीर केला आहे. पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. विजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.