पुण्याच्या पुराला काही दिवसही उलटत नाहीत तोच पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पुणे आणि धरण परिसरात पाऊस कोसळत आहे. यामुळे पानशेत, खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होऊ लागली असून खडकवासल्यातून दुप्पट पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवणे नांदेड सिटीचा पूल पाण्याखाली गेला असल्याचे समजते आहे.
पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे सकाळी ८.०० वा. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून ६ हजार ६९३ क्यूसेक व विद्युत निर्मिती गृहद्वारे ६०० क्यूसेकसेक असा एकूण ७ हजार २९३ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून सकाळी ९ वाजता १३ हजार ९८१ क्यूसेक करण्यात येणार आहे. मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 6848 क्युसेक्स विसर्ग वाढवून रात्री 1:00 वा. 9416 क्यूसेक्स करण्यात आला होता. तर सकाळी ७ वाजता तो ११ हजार ४०७ क्यूसेक करण्यात करण्यात आला आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास हा विसर्ग वाढण्याची शक्यता असून पुन्हा एकदा पुणे पाण्याखाली जाण्याची धाकधूक नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, अशा सूचना मुठा कालवा पाटबंधारे विभागाच्या उप अभियंता विभागाकडून देण्यात आल्या आहेत.