पुणे : गणेश विसर्जनानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात अजूनही संततधारा सुरूच असल्याने परिसरातील धरणांतील पाणी पातळी जलद गतीने वाढली आहे. यातच पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला व पानशेत धरणे पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरली आहेत. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात व येव्यात सतत वाढ होत आहे. त्यामुळे येत्या दोन तासांत मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १ हजार ९२९ क्युसेक्स विसर्ग वाढवून आज स. ११:०० वा. ३ हजार ४२४ क्यूसेक्स करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी किंवा पर्यटकांनी नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.