पुणे: दिवसभर कधी ढगाळ वातावरण, तर कधी ऊन हाेते, अशा विषम वातावरणामुळे शहरात रात्री सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह काल मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसू लागले होते. तसेच पाऊस पडण्याची चिन्हेही होती. अखेर सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पुण्यात पावसाला सुरुवात झाली.
त्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस अर्थात शनिवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री शहरात एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. पुणे शहरासोबतच उपनगरांमध्येही मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडीही झाली होती.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, द्रोणीय रेषेमुळे अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, दिवसाचे कमाल तापमान त्यासाेबत बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या आर्द्रतेमुळे स्थानिक परिस्थितीत जास्त उंचीचे ढग (क्युमिलोनिंबस ढग) तयार होत आहेत. बुधवारीही पुणे शहराच्या वरच्या वातावरणातही असे ढग तयार झाले. त्यामुळे सोसाट्याचा वाऱ्यांमुळे मेघगर्जनेसह पावसाला रात्री पावसाला सुरुवात झाली. काही काळ त्याचा जोर होता. त्यानंतर आजही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
शहराच्या हडपसर, कोथरूड, सिंहगड रस्ता, मध्यवर्ती पेठा, कॅम्प परिसर, सातारा रस्ता या भागांतही पावसाने हजेरी लावली. कोथरूड येथील पौंड रोड, जयभवानीनगर, सुतारदरा, जिजाऊनगर, गुजरात कॉलनी, आनंदनगर, भुसारी कॉलनी भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
पुढील दोन दिवस पाऊस
रात्री साडेआठ वाजता केलेल्या नोंदीनुसार शिवाजीनगर येथे १, हडपसर येथे ०.५ व चिंचवड येथे २.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारीही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून शुक्रवारी व शनिवारीही हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.