पुणे : जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने खरिपाची लगबग सुरू केली. जिल्ह्यात सर्वांत मोठ्या प्रमाणात घेतल्या जणाऱ्या भातपिकाची (हळवा) पेरणीही केली. दोन दिवस सुमारे ४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली; मात्र तो गायबच झाला. भात उत्पादक तर केलेल्या पेरण्या वाया जातात की काय? यामुळे चिंताग्रस्त आहेत.हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा पावसाचे दमदार आगमन झाले. गेले आठ दिवस जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. गेल्या शनिवारी तर काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. पुढील दोन दिवसांच्या काळात जोरदार पाऊस होणार असल्याच्या आशेने भातरोपांचे तरवे; तसेच खरिपाची पेरणी करण्यात व्यस्त झाला.शेतकरी सात जूनच्या मृगाच्या पावसावर जास्तीत जास्त अवलंबून असतो. यावर्षी मृगाच्या पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकºयाने शेतीची मशागत करून पेरणीला वेगाने सुरुवात केली आहे. मात्र पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पेरणी केलेले भात बियाणे वाया जाणार, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.या संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी सुनील खैरनार यांच्याशी संपर्क साधला असता, पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. आतापर्यंत ३0 टक्केपर्यंत पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे खरीपाचे नियोजन कोलमडणार नाही. मात्र आणखी दडी मारली तर भात उत्पादकांना फटका बसणार आहे.१,८५१.३मिलिमीटर जून महिन्यात एकूण पाऊस होता. त्याची सरासरी १४२.४ मिलिमीटर असते. दोन दिवसांत ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.आता बरस रे घना!दावडी : खेड तालुक्यात मे महिन्यात झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला होता. शेतकरी आनंदित होऊन पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतला. मात्र आठवड्याभरापासून वरुणराजाने अचानकपणे दडी मारल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आभाळ आलंय, पण पाऊस कुठाय? आता बरस रे घना, अशी आर्त हाक बळीराजा मारू लागला आहे. अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत.गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकºयांचे शेतीचे नियोजन बिघडले आहे. ऐन पावसाच्या काळात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्याचा हंगाम पेरणीचा असताना पाऊस नसल्याने भुईमूग, बाजरी, चवळी, मटकी, काळा घेवडा, फरशी, बटाटा या पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडत चालल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. कधी कधी कडाक्याचे ऊन पडत असल्याने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून आहे. पावसाळा सुरू झाला आणि बळीराजा जोमाने शेतीच्या कामाला लागला. बियाणे खरेदी केली.खताचा पुरेसा साठा जमा करून ठेवला. या हंगामात तरी चांगले पीक होईल, अशी अपेक्षा असताना पावसाने हुलकावणी दिली असून खेड तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात निसर्गाच्या पाण्यावरच शेती अवलंबून आहे. परंतु पावसाळा सुरू होऊन आठ दिवस पाऊस पडत नसल्याने शेतकरी आभाळाकडे टक लावून पाहत असल्याचे चित्र दिसत आहे.शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकटभोर : तालुक्याच्या पश्चिम भागात भाताची पेरणी होऊन १५ दिवस झाले; मात्र काही ठिकाणीच भाताची उगवण झाली आहे. आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने पेरलेले भाताचे बी जमिनीतच सुकू लागले आहे. काही दिवस अशीच परिस्थती राहिल्यास दुबार पेरणीचे संकट परिसरातील शेतकºयांवर येऊ शकते. यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.तालुक्यात मे महिन्यात वळवाचा पाऊस झाल्यावर तालुक्याच्या नीरा-देवघर व भाटघर धरणभागांतील शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात धूळवाफेवरच भाताचे बी पेरतात. या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच भाताच्या बियाण्याची पेरणी केली होती. त्यानंतर पाऊस पडल्याने काही ठिकाणी भाताची उगवण झाली आहे. मात्र, त्यानंतर १० दिवस होऊनही पावसाने दडी मारल्याने पेरलेले बी सुकू लागले असून उगवण झाली नसलेले बी खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तर, पूर्व भागातील शेतकरी जमिनीला चांगला वाफसा आल्यावरच पेरणी करतात. अद्याप तेथे पेरणी झालेली नाही. त्यामुळे मागील आठवडाभरापासून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. तालुक्यात एकूण १९६ गावे आहेत. खरीप हंगामाची गावे १५५, तर खरीप पिकाखालील क्षेत्र १७,४०० हेक्टर आहे. तालुक्यातील प्रमुख पीक भात असून सुमारे ७,५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. यात प्रामुख्याने हळव्या व गरव्या जातीच्या भाताची लागवड होते.जून संपत आला, तरी...वाजेघर : हवामानखात्याने दिलेल्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून सर्वत्र दाखल होईल. या भरवशावर वेल्हे तालुक्यातील शेतकरीवर्ग सुखावला होता. सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे भात (धूळ) पेरण्या सुरू झाल्या. रोपे लागवडीसाठी तयार होत असून अर्धा जून महिना संपत आला तरी भातलागवडीसाठी लागणाºया पावसाचे आगमन होत नाही. यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून वेल्हे तालुक्याची ओळख आहे. येथे भाताचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. पावसाचा अंदाज घेत येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात धूळपेरणी करतो. जूनअखेर ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निम्म्यापेक्षा ज्यास्त भातलावण झालेली असते. लोक बेनणीच्या कामाला सुरुवात करतात. तालुक्याच्या चारही भागांत पेरण्या झालेल्या आहेत. मशागतीची कामे उरकली असून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून चातकाप्रमाणे मॉन्सूनची वाट पाहत आहे.
पावसाच्या दडीने भातउत्पादक चिंताग्रस्त, पेरण्या वाया जाण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 2:44 AM