पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुणे शहर व धरण क्षेत्रावरही कृपा केली असून, धरण साठ्यात चांगली वाढ झाली आहे. पावसाला जोर नसला तरी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी पाणीसाठा वाढला आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साठत आहे. येत्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. घाटमाथ्यावर मुसळधारचा इशारा दिला असून, तिकडे सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पुणे शहर व जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे चांगला पाऊस होत आहे. २०, २४, २५ आणि २६ तारखेला आकाश ढगाळ राहील. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होईल. दरम्यान, पुढील आठवड्यात पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय राहणार आहे. त्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे. पुण्यात पुढील आठवड्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
संततधार पावसामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साठत आहे. परिणामी वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने त्यातील खडी उखडली जात आहे. त्यात वाहने आदळत आहेत. रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी त्यातून न्यावी लागत आहे. अनेकांच्या दुचाकी बंद पडत आहेत.
चार दिवसांमध्ये राज्यातही मुसळधार
येत्या २१ व २२ जुलै रोजी पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहावे लागणार आहे. चार दिवसांमध्ये राज्यातही मुसळधार पाऊस होणार आहे. पुण्यातील रेड अलर्ट हा घाट भागासाठी आहे. - कृष्णानंद होसळीकर, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे
गेल्या २४ तासांतील पाऊस
लोणावळा : २८०.५ मिमीलवासा : १४३ मिमी
तळेगाव : ४२.० मिमीपाषाण : २५.५ मिमी
एनडीए : २५.० मिमीशिवाजीनगर : १७.६ मिमी
चिंचवड : १५.० मिमीकोरेगाव पार्क : १२.० मिमी
वडगाव शेरी : १२.० मिमीहडपसर : ७.० मिमी
हवेली : ७.० मिमीमगरपट्टा : ०.५ मिमी