पुणे: शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोज सायंकाळी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. पण आज मात्र दुपारीच तीन वाजता सरी कोसळल्या. श्रावण महिना सुरू असल्याने उन्ह-पावसाचा खेळ पुणेकरांना पहायला मिळत आहे.
जून महिन्यापासून आतापर्यंत पुणे शहरात चांगला पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील पावसामुळे सर्व धरणंही भरून गेली. मात्र ऑगस्ट महिना सुरू झाला आणि पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पण पंधरा ऑगस्टनंतर मॉन्सून सक्रिय झाला आणि पुण्यात सायंकाळी जोरदार पाऊस होत आहे. प्रामुख्याने पूर्व भागाला वरूणराजा चांगलाच झोडपून काढत आहे. दोन-तीन तासांमध्ये शंभर मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद पूर्व भागात झाली आहे.
आज (दि.२२) गुरूवारी सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज सर्वांनाच येत होता. पण दुपारच्या उन्हानंतर चक्क पावसाला सुरवात झाली. भर दुपारी तीन वाजता पाऊस सुरू झाला. मध्यम ते हलक्या सरी कोसळत आहेत. पुढील दोन-तीन तास काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे.