पुणे : पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी आज (दि. ११) सायंकाळी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. पुण्याच्या आकाशात ढगांची निर्मिती झाली असून, पुढील दोन तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात घट झाली असून, सायंकाळी पावसाचा शिडकावा होत आहे. त्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. परंतु, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान होत आहे. आज देखील सायंकाळी वादळी पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील (संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ) अशा २९ जिल्ह्यांत आजपासून पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार दि. १८ मे पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. रविवारी (दि. १२) ते मंगळवार (दि. १४) पर्यंतच्या ३ दिवसात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली ह्या आठ जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीच्या शक्यतेची तीव्रता अधिकच जाणवू शकते, असा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.