पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात लवकरच सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी ‘रेप्टाइल पार्क’ची उभारणी केली जाणार असून, प्राणिसंग्रहालयातील सर्पोद्यान आता या पार्कच्या रूपाने पर्यटकांना खुले होणार आहे.
सध्याच्या सर्पोद्यानात जमिनीत कुंड करून विविध प्रजातीच्या सापांसह, अजगर, मगर व अन्य सरपटणारे प्राणी ठेवलेले आहेत. ते नव्याने उभारण्यात येणाऱ्या ‘रेप्टाइल पार्क’मध्ये ग्लास बॅरिअरमध्ये ठेवण्यात येणार असल्याने, पर्यटकांना अधिक सुलभरीत्या पाहता येणार आहेत.
कोरोना आपत्तीत हे प्राणिसंग्रहालय दोन वर्षे पर्यटकांसाठी बंद होते; परंतु आपत्तीनंतर संग्रहालय खुले झाल्यावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्राणिसंग्रहालयात करण्यात आलेले बदल आणि पर्यटकांसाठी करण्यात येणाऱ्या नवीन सुविधांची माहिती महापालिकेच्या वतीने बुधवारी पत्रकारांना देण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव उपस्थित होते.
पर्यटकांना अधिकाधिक नवीन वन्य प्राणी पाहण्याची संधी मिळावी, यासाठी देशातील विविध प्राणिसंग्रहालयांतून इतर प्राणी प्राणी विनिमय धोरणांतर्गत आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या प्राणिसंग्रहालयात सर्प उद्यान आहे; मात्र ते अद्ययावत करून नवीन सरपटणारे (रेप्टाइल पार्क) उद्यान तयार करण्यात येणार आहे. हे सरपटणारे उद्यान १५ हजार चौरस मीटरच्या विस्तीर्ण जागेत बांधण्यात येत असून, त्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या दोन वर्षांत ते पर्यटकांसाठी खुले होणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे ‘रेप्टाइल पार्क’ उभारण्यात येत आहे.
पर्यटकांच्या संख्येत वाढ
कोरोना आपत्तीनंतर संग्रहालयात सोमवार ते शनिवारदरम्यान ५ ते ९ हजार पर्यटक येत आहेत. रविवारी हीच संख्या २० हजारांच्या घरात पोहोचत आहे. कोरोना आपत्तीपूर्वी संग्रहालयास साडेपाच कोटींचे उत्पन्न मिळत होते. आता हे उत्पन्न दुपटीने वाढले असून, येथील प्राण्यांच्या खाण्यावर वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्या देखरेख सुरक्षेसाठी संग्रहालयात महापालिकेचे १०० कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत.
लवकरच झेब्रा दाखल होणार
महापालिकेच्या या प्राणी संग्रहालयात लवकरच झेब्रा दाखल होणार असून, त्यासाठी स्वतंत्र खंदक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या संग्रहालयाच्या १३० एकर जागेवर ३० एकरांमध्ये तलाव असून, उर्वरित जागेत विविध प्राण्यांसाठी स्वतंत्र व मोठे खंद आहेत. या प्राण्यांमध्ये आशियाई नर-मादी सिंह, पांढरा वाघ, पाच वाघ, बिबट्या, अस्वल, हरीण, काळवीट, माकड, हत्ती इत्यादींचा समावेश होतो. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये भारतीय अजगर, कोब्रा, विविध प्रकारचे साप, देशी मगरी आणि तारा कासव यांचा समावेश आहे