पुणे : देशातील ‘राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर’ निवडण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्यावतीने देशातील ११४ शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणात पुण्याचे स्थान अव्वल राहावे़ याकरिता ‘इज ऑफ लिव्हिंग’ या ऑनलाईन सर्वेक्षणात जास्तीत जास्त पुणेकर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. महापौर मोहोळ व स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अगरवाल यांनी शुक्रवारी (दि. ७) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोहोळ म्हणाले, की सन २०१८ मध्ये पुणे शहराला ‘राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर’ म्हणून प्रथम क्रमांक मिळाला होता. या क्रमवारीत यावर्षीही पुण्याचे स्थान अव्वलस्थानी यावे यासाठी पुणेकरांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन सर्व्हेक्षणात येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत पुणेकरांनी सहभागी व्हावे. यात चोवीस प्रश्न विचारण्यात येणार असून, पुणेकरांनी योग्य पर्याय निवडून आपले मत नोंदवायचे आहे. या अभिप्रायाचे मुल्यांकन होऊन सर्वोत्तम शहराच्या निकषाची पूर्तता होणार आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का नागरिकांनी या सर्वेक्षणात मत नोंदविणे अपेक्षित आहे. याकरिता ‘ http://eoi2019.org/citizenfeedback ’या लिंकवर जाऊन नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मोहोळ म्हणाले.................................‘‘नागरिकांना राहण्यासाठी उत्तम दर्जाची शहरे निर्माण व्हावीत, या दृष्टीने देशातील ११४ शहरांचे मूल्यांकन केले जात आहे. त्यासाठी शहरांमधल्या राहण्यासाठीच्या योग्यतेची (लिव्हेबिलिटी) चाचपणी केली जात आहे. यात संस्था व प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा (शिक्षण, आरोग्य),आर्थिक आणि भौतिक संरचना अशा चार श्रेणींमध्ये एकूण १५३ संकेतकांच्या आधारे राहण्यायोग्य शहरांची क्रमवारी केली जाईल. अंतिम निकषासाठी आवश्यक गुणांमध्ये ७० टक्के गुण हे शहरातील वरील माहितीच्या आधारे आणि ३० टक्के गुण पुणेकरांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारे मिळणार आहेत.- रूबल अगरवाल़ ----------------
आपलं पुणे आहे का ‘राहण्यायोग्य’?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 8:05 PM
चोवीस प्रश्न विचारण्यात येणार असून, पुणेकरांनी योग्य पर्याय निवडून आपले मत नोंदवायचे आहे.
ठळक मुद्दे- शहर सर्वेक्षणात सहभागी होण्याचे पुणेकरांना आवाहन