लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नव्या वर्षातील सर्वांत नीचांकी किमान तापमानाची नोंद आज राज्यातील अनेक शहरात नोंदविली. नाशिक ९.२, पुणे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे. या हंगामातील तिसरे सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात नोंदविले गेले आहे.
मराठवाडा व विदर्भाच्या बहुतांश भागात, तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.
पुणे शहरात डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात २२ डिसेंबर रोजी ८.८ अंश आणि २१ डिसेंबर रोजी ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर किमान तापमानात वाढ होत गेली होती.
जानेवारी महिना हा गेल्या ४ दशकातील सर्वांत उबदार महिना ठरला होता. फेब्रुवारी महिन्यात आता किमान तापमानात घट आढळून आली आहे. ही घट आणखी एक, दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील किमान तापमानात चढउतार होत होता. ५ फेब्रुवारीला १२.१, ६ फेब्रुवारी रोजी ११.३ आणि ७ फेब्रुवारीला १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात आज आणखी घट होऊन किमान तापमान सिंगल डिजिट म्हणजे ९.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. पाषाण येथे ११.१ आणि लोहगाव १२.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान : बारामती १०.१, सातारा १४, महाबळेश्वर १२.४, नाशिक ९.२, जेऊर १०, परभणी ११.३, नांदेड १२.३, औरंगाबाद १०.५, जालना १२.४, सांताक्रुझ १८, मुंबई २१.२, ठाणे १९, अलिबाग १५.१, डहाणु १६.९, माथेरान १७.८, अकोला १०.८, अमरावती ११.२, बुलढाणा १३.३, ब्रम्हपुरी १०.३, चंद्रपूर ११.२, गडचिरोली १०.६, गोंदिया १०.५, नागपूर ९.४, वर्धा १०.९, वाशिम १६.८, यवतमाळ १३.