नम्रता फडणीस/आशिष काळे
पुणे : महापालिकेच्या पेशवे पार्क वाहनतळावर पार्किंगच्या नावाखाली सर्रासपणे लूट केली जात आहे. ठेकेदाराने पैसे वसूल करण्यासाठी येथे चार ते पाच अल्पवयीन मुलांच्या टोळ्या ठेवल्या आहेत. पावती दिली जाते ३ रुपयांची; पण वाहनचालकांकडून प्रत्यक्षात घेतले जातात १० रुपये. पार्किंग शुल्काचा फलकही काढून फेकून देण्यात आला आहे. वाहनचालकाने पावती घेतली नसेल तर दंडात्मक रक्कम वसूल करण्याच्या नावाखाली ५० रुपये मागितले जात आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पार्किंगची निविदा रद्द केल्यानंतरही सुरू आहे.
सारसबागेचा परिसर हा कायमच गजबजलेला. येथे एक वाहनतळ आहे. त्या शेजारीच तीन देवींचे महालक्ष्मी मंदिर आहे. त्यामुळे तिथे शनिवारी-रविवारी गाड्या पार्क करायला जागा मिळत नाही. वाहनचालकांना यू टर्न मारून सारसबागेच्या उजव्या बाजूला चौपाटीच्या दिशेने येऊन गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधावी लागते. तिथेही गर्दीमुळे जागा मिळणे अशक्य असते. कुठेही नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यास ती उचलण्याची भीती असल्याने शेवटी पेशवे पार्क शेजारच्या वाहनतळावर पैसे देऊन गाडी पार्क करण्याशिवाय वाहनचालकांना गत्यंतर उरत नाही. हीच वाहनचालकांची अडचण ओळखून ठेकेदाराकडून लूट सुरू आहे.
शनिवारी-रविवारी गर्दीच्या दिवशी वाहनचालकांकडून अवाच्यासव्वा पैसे उकळले जात आहेत. नागरिक पावती पाहण्याचेही कष्ट घेत नसल्याने ठेकेदाराचा हा गोरखधंदा दिवसाढवळ्या सुरू आहे. इथे जर ही स्थिती असेल तर महापालिकेच्या इतर पार्किंग स्थळांवर काय चित्र असेल, असे प्रश्न निर्माण हाेत आहेत.
...अशी हाेतेय लूट
स्थळ : पेशवे पार्क वाहनतळवार : शनिवार- रविवार (दि. १८ व १९)वेळ : सायं ६ ते ८
प्रतिनिधी : पार्किंगचे किती पैसे द्यायचे?मुलगा : १० रुपयेप्रतिनिधी : पावती आहे का?मुलगा : हो देतोप्रतिनिधी : अरे पण, पावतीवर ३ रुपये लिहिले आहेत.मुलगा : तरीही १० रुपयेच द्यावे लागतील. आम्ही चिल्लरमध्ये डिल करत नाही.प्रतिनिधी : देणार नाही, जेवढे लिहिले आहेत तेवढेच देईन. मी १ तासच गाडी लावणार आहे.मुलगा : १ तासाच्या वर गाडीचे तास झाले तर ५० रुपये द्यावे लागतील.प्रतिनिधी : म्हणजे? ३ तास झाले तरी ३ रुपयांच्या हिशोबाने ९ रुपये होतील.मुलगा : काहीच बोलला नाही, गुपचूप. आवाज वाढविल्यावर ३ रुपये घेतले.
प्रसंग १ :-
रंगपंचमीच्या दिवशी अर्थात रविवारी मी मुलीला घेऊन सारसबागेत गेले होते. तिथे पार्किंगला जागा नसल्याने पेशवे उद्यानाच्या शेजारी महापालिकेच्या पार्किंगस्थळी गाडी पार्क करायला जात होते. तेव्हा १४ ते १५ वर्षांची मुले वाहनतळावरून बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांना ५० रुपये मागत होते. मला हे पैसे जरा जास्तच वाटले. मी गाडी पार्क करून त्या मुलांना पार्किंगचे पैसे किती हे विचारायला गेले. त्यांनी सांगितले १० रुपये. मी त्याला १० रुपये गुगल पे केले. पावती मिळाल्यानंतर निरखून पाहिले तेव्हा त्यावर एका तासासाठी ३ रुपये लिहिले होते. त्या मुलाकडे पुन्हा गेले आणि म्हटले की अरे यावर ३ रुपये लिहिले आहेत आणि तू १० रुपये कसे घेतो? तेव्हा तो म्हणाला तुमच्याकडे सुट्टे ३ रुपये असेल तर द्या, मी ३ रुपये गुगल पे केल्यावर त्याने मला १० रुपये परत दिले. - भावना बाठिया-संचेती, नागरिक
प्रसंग २ :-
मी तिथे गाडी लावायला गेलो. पावती पाहिल्यानंतर त्यावर ३ रुपये लिहिले होते. मी विचारले तर उद्धटपणे दहा रुपये असतील तर द्या, आम्ही सुट्ट्या पैशात खेळत नाही, असे सांगण्यात आले. पार्किंगला कुठंच जागा नसल्याने १० रुपये द्यावे लागले. - ऋषिकेश काळे, नागरिक
गाड्या उचलण्याची भीती
महापालिकेकडून वाहनतळासाठी अनेक भूखंड राखीव ठेवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात वाहनांच्या तुलनेत वाहनतळांची संख्या कमी आहे. काही भागांमध्ये खासगी पे ॲण्ड पार्क सुरू आहेत. वाहतूक पोलिसांकडून गाड्या उचलण्याची भीती असल्याने वाहनचालकही मागतील तेवढे पैसे द्यायला तयार होत आहेत.
जे.एम. रस्त्यावरील वाहनतळ बंदच
जंगली महाराज रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क होणाऱ्या गाड्यांचा विचार करून ८० गाड्या एकाचवेळी पार्क होऊ शकतील, असे भव्य वाहनतळ जी.एम. रस्त्यावर उभे केले होते. गेल्या काही वर्षांपासून हे वाहनतळ बंदच आहे.
महापालिका म्हणते, आठ वाहनतळांची निविदा रद्द
शहरात पुणे महापालिकेचे एकूण ३१ वाहनतळ आहेत. त्यातील सदाशिव पेठेतील पेशवे पार्क, एनर्जी उद्यान, नवलोबा वाहनतळ, सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यान येथील वाहनतळ, बिबवेवाडी येथील डिसिजन टॉवर येथील वाहनतळ, गुलटेकडी येथील साईबाबा मंदिराजवळील वाहनतळ, स्व. राजीव गांधी उद्यान प्राणिसंग्रहालय येथील वाहनतळ आणि कात्रज दूध डेअरीजवळील पीएमपीएमएल टर्मिनल येथील आठ वाहनतळाचा ठेका एकाच ठेकेदाराकडे होता. संबंधित ठेकेदार पार्किंगसाठी जादा शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे सुरुवातीला दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर या आठही वाहनतळाच्या निविदा १० मार्च रोजी पालिकेने रद्द केल्या आहेत. या ठेकेदाराकडून पार्किंग ताब्यात घेताना ताबा घेण्याच्या दिवसापर्यंतचे शुल्क महापालिका ठेकेदाराकडून घेते. या आठही वाहनतळासाठी नवीन निविदा काढली आहे. या निविदेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पार्किंग मोफत असल्याचा फलक लावण्यात येणार आहे. - अभिजित अंबेकर, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका