पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आणि पुण्यातील सर्व रुग्णालये फुल्ल झाली. वाढत गेलेल्या रूग्णांसोबत मृत्यूचा आकडाही वाढत गेला. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याच्या यंत्रणेवर प्रचंड ताण आला. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठीही सहा ते आठ तासांचे वेटिंग वाढले. नागरिकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी स्व-रुपवर्धिनी, सेवा सहयोग आणि सुराज्य सर्वांगीण प्रकल्प या संस्था पुढे आल्या. या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी ससूनच्या डेड हाऊसपासून वैकुंठ स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारांपर्यंतची सर्व व्यवस्था चोख लावल्याने वेटिंगचा वेळ कमी झाला आहे.
गेल्या दोन महिन्यात कोरोनाने शहरात हाहा: कार उडविला आहे. या काळात मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अंत्यविधींसाठी लागणारा वेळ आणि नातेवाईकांना होणारा मनस्ताप यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची आवश्यकता आहे. पालिकेला या कामात मदत करून अंत्यविधी करण्याची जबाबादरी या तीन संस्थांनी उचलली आहे. मुळात ससूनच्या शवागारावर प्रचंड ताण आहे. शवविच्छेदनासोबतच कागदपत्रांची तयारी, मयत पास आदींसाठी मनुष्यबळ नसल्याने मृतदेह सोपविण्यास वेळ लागत होता. यासोबतच शववाहिकेची उपलब्धता हा मोठा प्रश्न होता.
त्यामुळे या स्वयंसेवकांनी तीन टीम तयार केल्या. एक टीम ससून रुग्णालयात तैनात केली. दुसरी टीम वैकुंठ स्मशानभूमीत प्रत्यक्ष अंत्यविधी करण्यासाठी नेमली. तर, तिसरी टीम 'बॅक ऑफिस' म्हणून कार्यरत ठेवली. ससूनमध्ये सहा जणांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कार्यकर्ते कोविड मृतदेह आल्यावर डॉक्टरांना कळवितात. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावर सर्व प्रक्रिया पार पडली जाते. नातेवाईकांना झेरॉक्स दुकाने बंद असल्याने कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यातच दीड ते दोन तास वेळ जात होता. कार्यकर्त्यांनी याठिकाणी एक झेरॉक्स मशीन आणि प्रिंटर ठेवल्याने ही समस्या दूर झाली. यासोबतच मयत पास काढून देण्यासाठी दोन कार्यकर्ते स्वतंत्रपणे नेमण्यात आले. तरुण करीत असलेल्या कामाची दखल घेत पालिकेने त्यांना स्वतंत्र कक्ष आणि इंटरनेट सुविधा पुरविली आहे.
नोंदणी आदी सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शववाहिकेमधून वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पाठविला जातो. तेथे पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी केले जातात. यासाठी ४ ते ५ कार्यकर्ते थांबतात. त्यांच्यावर देखरेखीसाठी दोन स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत. सर्वांना आठ तासांच्या शिफ्ट लावून देण्यात आलेल्या आहेत. यानुसार २४ तास हे काम सुरू आहे. २१ एप्रिल रोजी हे काम सुरू झाले असून आतापर्यंत १७० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. -----या स्वयंसेवकांच्या तीन टीममधील तिसरी टीम 'बॅक ऑफिस' म्हणून काम करते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, अंत्यविधीसाठी आवश्यक साहित्य पुरविणे, काम करणाऱ्या स्वयंसेवकांना जेवण पुरविणे अशी कामे ही टीम करते.-----मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक पद्धत वापरली जाते आहे. शेण, भुस्सा यापासून तयार करण्यात आलेल्या ब्रॅकेटचा ज्वलनासाठी वापर केला जातो. त्यामुळे फारसा धूर होत नाही. हे ब्रॅकेट जुन्नरवरून आणले जातात. ----हे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरवारे हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ दिवसांनंतर या कार्यकर्त्यांची स्वाब चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना घरी पाठविले जाणार आहे. ----स्मशानभूमीच वाढदिवसअविनाश धायरकर हा तरुण गेले आठवडाभर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत करोना संसर्गाने मृत पावलेल्या व्यक्तींना अग्नी देणे, सरण रचणे, नावनोंदणी करणे अशी कामे करीत आहे. अविनाशचा मंगळवारी वाढदिवस होता. स्व-रूपवर्धिनीचा कार्यकर्ता असलेल्या अविनाशने त्याचा वाढदिवस घरी केक कापून नव्हे तर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारांची सेवा बजावतच साजरा केला. सेवेमधून मिळणारा आनंद केक कापण्यापेक्षा अधिक मौल्यवान असल्याचे त्याने सांगितले.