पुणे: ‘लगी आज सावन की फिर वो झडी है...’ अशीच अवस्था शनिवारच्या सकाळी पुणेकरांनी अनुभवली. संपूर्ण आकाश ढगांनी भरून गेलेले आणि त्यामुळे पावसाची रिपरिप सुरूच होती. दिवसभर पावसाची संततधार सुरू राहील, असे वाटत असताना दुपारी मात्र काहीकाळ पावसाने विश्रांती घेतली. येत्या दोन-तीन दिवसांत ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून वरूणराजाने पुणेकरांवर कृपा केली आहे. जून महिन्यात ओढ दिल्यानंतर जुलै महिन्यात मात्र वरूणराजा प्रसन्न झाला आहे. त्याची सुरुवातही १ जुलै रोजी झाली. सकाळपासूनच वरूणराजाने जोरदार आगमन केले. त्यानंतर दुपारी काहीकाळ आकाश अंशत: ढगाळ होते. त्यामुळे पुणेकरांना जरासा घराबाहेर पडण्यासाठी उसंत मिळाली. शनिवारची सुटी असल्याने अनेकजणांनी बाहेरगावी जाण्याचा बेत आखला होता. परिणामी, शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा अनुभव आला.
पुणे शहरात १ जुलै रोजी २० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जून महिन्यात १०४ मि.मी. पाऊस झाला. यातील जूनच्या अखेरच्या आठवड्यातच हा पाऊस नोंदविला गेला आहे. कारण मान्सूनचा पाऊस २५ जूननंतरच पुणे शहरात सुरू झाला. आता जुलै महिना हा चांगल्या पावसाचा असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
येत्या काही दिवसांमध्ये घाट माथ्यावर सातत्याने मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात येत आहे. त्यामुळे त्या परिसरात फिरायला जाताना पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
घाट माथ्यावरील पाऊस
लोणावळा : १३५ मि.मी.कोयना : ११० मि.मी.खोपोली : १५६ मि.मी.ताम्हिणी : २१० मि.मी.
शहरातील पाऊस
पाषाण २८.५ मि.मी.शिवाजीनगर : २०.४ मि.मी.वडगाव शेरी : १९.५ मि.मी.कोरेगाव पार्क : १८.० मि.मी.एनडीए : १४.५ मि.मी.हडपसर : ७.५ मि.मी.हवेली : ४.५ मि.मी.मगरपट्टा : ०.५ मि.मी.