पुणे :बिबट्याचा अधिवास आता राहिला नाही, त्यामुळे तो खाद्य मिळेल, तिकडे फिरतो आहे. पुण्याच्या उपनगरांत आता ताे अनेकदा आपली ‘एन्ट्री’ दाखवत आहे. नुकताच त्याने विश्रांतवाडी परिसरात फेरफटका मारला. त्यामुळे त्या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी सावध राहावे, त्यामुळे वन विभागाला आता ‘रात्र बिबट्याची आहे... तुम्ही भटकू नका’, असे आवाहन करावे लागत आहे.
विश्रांतवाडीमध्ये रात्री दीड वाजता बिबट्या फिरत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर फिरत आहे. याविषयी वन विभागाने दुजोरा दिला आहे. तसेच विश्रांतवाडी परिसरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी गस्त वाढविली आहे. गेल्या काही वर्षांपासून फुरसुंगी, वडकी, कात्रज परिसरातील गुजरवाडी, वाघोली आणि आता विश्रांतवाडीतही बिबट्याचा वावर दिसून आला आहे.
शहराच्या आजूबाजूला लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचराकुंड्या भरून वाहतात. त्या कचऱ्याकुंड्यांमुळे डुक्कर, भटकी कुत्री वाढली आहेत. हे बिबट्यासाठी सहजशक्य असे भक्ष्य आहे. त्यामुळे बिबट्याचे उपनगरामध्ये येणे-जाणे वाढले आहे.
दक्ष राहा; अन्यथा ‘भक्ष्य’ व्हाल!
पुणे शहरात रात्रीदेखील अनेक नागरिक फिरत असतात. त्यामुळे त्यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. विशेषत: वडकी, कात्रज, फुरसुंगी, वाघोली, विश्रांतवाडी या परिसरातील नागरिकांनी शक्यतो रात्री घराबाहेर पडू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
येथे वाढला संचार
- कात्रज-गुजरवाडी, फुरसुंगी, काळेपडळ, वडकी, मुंढवा, विश्रांतवाडी, हिंजेवाडी, किल्ले सिंहगड परिसरात बिबट्या दर्शन देत आहे. भक्ष्याच्या शोधात तो रात्री फिरतो. एखादा कुत्रा किंवा डुक्कर असे प्राणी तो पकडून घेऊन जातो. हे प्रमाण वाढले तर पुणेकरांना रात्री घराबाहेर पडणे धोक्याचे होणार आहे.
वन्यजीवांचे प्रजोत्पादन वाढवायला हवे
बिबट्याचा अधिवास नष्ट झाल्याने तो इतरत्र फिरत आहे. तो पूर्वी भीमाशंकर अभयारण्य व जुन्नर परिसरात राहत होता. आता त्याचे क्षेत्र पुण्यापर्यंत येत आहे. बिबट्यांना त्यांचे भक्ष्य त्यांच्या अधिवासात मिळाले तर ते पुण्याकडे येणार नाहीत. त्यासाठी हरण, चिंकारा, चितळ, सांबर या वन्यजीवांचे प्रजोत्पादन मोठ्या प्रमाणावर करायला हवे, अशी कल्पना माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोळकर यांनी अनेकदा मांडली आहे.